Mumbai : ...अन् कसाबचा कट उघड; उज्ज्वल निकम यांचा दावा Photo - Salman Ansari
मुंबई

Mumbai : ...अन् कसाबचा कट उघड; उज्ज्वल निकम यांचा दावा

कसाबला सिगारेटचे प्रचंड व्यसन होते. त्याला सिगारेट देण्याचे आमिष दाखवून रिगल हल्ल्याच्या कटाची माहिती मी काढून घेतली होती, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.

प्रतिनिधी

मनोज रामकृष्णन

मुंबई : कसाबला सिगारेटचे प्रचंड व्यसन होते. त्याला सिगारेट देण्याचे आमिष दाखवून रिगल हल्ल्याच्या कटाची माहिती मी काढून घेतली होती, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.

निकम यांनी त्याच्याकडून ही माहिती काढून घेतली होती. मात्र, या माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी होऊ शकली नसल्याने ती अभियोजन पक्षाच्या कागदपत्रांमध्ये समाविष्ट करण्यात आली नव्हती.

मुंबई पुस्तक महोत्सवात गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी आयोजित ‘पेजेस दॅट हेल्ड मी’ या सत्रात बोलताना निकम यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडलेला आणि नंतर फाशी देण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने मुंबईत बोटीने आलेल्या १० दहशतवाद्यांच्या गटाने रिगल सिनेमावरही हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र, पोलिसांना दिलेल्या जबाबात कसाबने हा खुलासा केला नव्हता.

‘तो सत्य बोलत होता की नाही, हे मला माहीत नाही; पण त्याने ही माहिती दिली होती,” असे निकम म्हणाले. मी त्याला सांगितले होते की, ‘न्यायालयाच्या परिसरात सिगारेट ओढण्यास मनाई असली, तरी न्यायालयात यापूर्वी कधीही न सांगितलेली एखादी गोष्ट सांगितली तर मी त्याला सिगारेट देईन.’

कसाबला तुरुंगात मटण बिर्याणी दिल्याच्या कथित घटनेवरील वादाचा उल्लेख करताना निकम यांनी हा प्रकार कधीच घडला नसल्याचे स्पष्ट केले.

अभिनेता संजय दत्तला कठोर टाडा अंतर्गत सुरुवातीला आरोपी केले. मात्र, अखेरीस त्याला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवले. या प्रकरणात प्रभावशाली व्यक्तींकडून दबाव आला होता का, असा प्रश्न विचारल्यावर निकम म्हणाले, “माझ्यावर कोणी दबाव आणू शकतो, असे तुम्हाला वाटते का? कोणी दबाव आणला असता, तरी मी त्याला बळी पडलो नसतो. हा व्यवसायाचा एक भाग आहे. असे करण्यास सांगणाऱ्या व्यक्तीचा अहंकार मोडून काढून आपले काम पुढे करणे, हे संबंधित व्यक्तीवर अवलंबून असते.”

संजय दत्तला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा तो थरथरत होता आणि न्यायालयातील आरोपीच्या पिंजऱ्यात तो कोसळेल, अशी भीती व्यक्त केली जात होती, अशी आठवण निकम यांनी सांगितली. ‘मी त्याच्याकडे गेलो आणि त्याच्याशी बोललो. तो पडला असता, तर त्यासाठी मलाच दोष दिला गेला असता,’ असे निकम म्हणाले.

पोलीस आणि सरकारी वकिलांमधील समन्वय सुधारण्यासाठी भारताच्या न्यायव्यवस्थेत सुधारणा आवश्यक असल्याचेही त्यांनी मान्य केले. तथापि, या खटल्यात एका आरोपीला दोषी ठरवण्यात यश आले होते.

अभियोजन पक्षाची भूमिका केवळ आरोपीने गुन्हा केला हे सिद्ध करण्यापुरती मर्यादित नसून, गुन्ह्यामागील हेतू शोधणेही महत्त्वाचे असल्याचे निकम यांनी सांगितले.

कसाबच्या कुटुंबीयांपासून तो दूर असल्याची जाणीव करून देण्यासाठी निकम यांनी स्वतःच्या हातातील राखी त्याला दाखवली होती. मात्र, कसाबने त्यावर कोणतीही पश्चात्तापाची भावना किंवा कुटुंबीयांची आठवण व्यक्त केली नाही.

“आम्ही पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संवाद साधत होतो. त्यांनी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा सहभाग नाकारला आणि पुरावे मागितले. या प्रकरणातील माफीचा साक्षीदार झालेल्या अमेरिकन नागरिक डेव्हिड हेडलीच्या साक्षीने न्यायालयात पाकिस्तानचा सहभाग सिद्ध केला,” असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

कामाच्या वेळावरून कुटुंबात वाद

कामाच्या वेळांवरून आणि कुटुंबासाठी वेळ न देण्यावरून माझे मुलाशी वाद झाले होते. मात्र, चित्रपटात दाखविल्याप्रमाणे ते वाद इतके कटू नव्हते. म्हणूनच मी चित्रपट ९९ टक्के सत्य असल्याचे म्हटले,’ असे निकम म्हणाले.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

प्रत्येक फ्लॅटसाठी प्रॉपर्टी कार्ड; राज्यातील सात कोटी फ्लॅटधारकांना मिळणार दिलासा, राज्य सरकारचा प्रस्ताव

हाय फॅट, साखर, मिठाची स्वतंत्र इशारा चिन्हे अनिवार्य; पाकीटबंद खाद्यपदार्थांबाबत सुप्रीम कार्टाचा आदेश

वॉशिंग सेंटर : पाणी वापरावर बंदी; पिण्याचे पाणी न वापरण्याबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव, गृहनिर्माण सोसायट्यांवरही निर्बंधांची शक्यता

कॉफी डे एंटरप्रायझेसच्या व्यवहारांची चौकशी होणार; निधी वळवल्याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिटर नियुक्त

Navi Mumbai : तुर्भे रेल्वे उड्डाणपूल चार महिने वाहतुकीसाठी बंद; ३१ मार्चपर्यंत वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग