संग्रहित छायाचित्र 
मुंबई

मुंबईकरांसाठी आनंद वार्ता! वर्षअखेर ५० किमी मेट्रो मार्ग येणार सेवेत; MMRDA चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची माहिती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ३३७ किलोमीटर लांबीचे मुंबई मेट्रो नेटवर्क तयार करण्यात येत आहे. यापैकी काही मेट्रो मार्गांची कामे अंतिम टप्प्यात पोहचली आहेत.

तेजस वाघमारे

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ३३७ किलोमीटर लांबीचे मुंबई मेट्रो नेटवर्क तयार करण्यात येत आहे. यापैकी काही मेट्रो मार्गांची कामे अंतिम टप्प्यात पोहचली आहेत. त्यानुसार वर्षाखेर सुमारे ५० किलोमीटर मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामध्ये एमएमआरडीएच्या २० किलोमीटर तर मेट्रो ३ च्या ३०किलोमीटर मार्गिकेचा समावेश आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होईल, असा विश्वास एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला.

दैनिक ‘नवशक्ति’ आणि ‘फ्री प्रेस जर्नल’च्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘संवादमाला’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. ते म्हणाले की, मुंबईत सध्या ६९ किलोमीटर मार्गावर मेट्रो धावत आहे. या वर्षी मेट्रो २ ब डायमंड गार्डन ते मंडाले कारशेडपर्यंत सुरू होईल. सध्या या मार्गिकेच्या चाचण्या सुरू आहेत. हा मार्ग चेंबुरला मोनो रेलसोबत जोडला जाईल. पुढे तो मेट्रो ३ मार्गिकेशी जोडला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कुलाबा किवा थेट कुलाबापर्यंत प्रवास करता येईल. त्याचप्रमाणे मेट्रो ३ चा उर्वरित मार्ग या वर्षी सुरू होईल. तसेच मेट्रो ९ मार्ग ५ किलोमीटर पर्यंत सुरू होईल. त्याचप्रमाणे वडाळा- घाटकोपर- कापूरबावडी हा मेट्रो ४ मार्ग १० किलोमीटर पर्यंत सुरू होऊ शकतो. त्यामुळे एमएमआरडीएचा २० किलोमीटर तर एमएमआरसीचा मेट्रो ३ मार्गिकेचा ३० किलोमीटर असा एकूण ५० किलोमीटर मार्ग या वर्षात सुरू होण्याची अपेक्षा आहे.

एमएमआरडीए बॅकबे रिक्लेमेशनचा विकास करण्यात येणार आहे. मात्र यामध्ये अनेक अडचणी आहेत. या भागातील झोपडपट्टी, विधान भवन, तसेच कोस्टल रोड यामुळे या कामात अडचणी असल्याचे, मुखर्जी म्हणाले.

एमएमआरडीए सध्या तीन मार्गदर्शक तत्त्वांवर काम करत आहे. मुंबईतील पायभूत सुविधा कमी झाल्या असून त्यामध्ये सुधारणा करणे, एमएमआर क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र या ठिकाणी नियोजनाचा अभाव आहे. या भागांचा नियोजनपूर्वक विकास करण्यात येणार आहे. ‘मुंबई इन मिनिट’ हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लागणारा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असे मुखर्जी म्हणाले.

बीकेसी हे ग्रोथ सेंटर आहे. एमएमआरडीए ही देशातील सर्वात मोठी प्लॅनिंग अथोरिटी आहे. मुंबईमध्ये पूर्वी पूर्व-पश्चिमेला जोडणारे मार्ग नव्हते. त्याचे काम एमएमआरडीएने बहुतांशी पूर्ण केले आहे. मेट्रो आणि रस्ते प्रकल्पामध्ये रिंग रोड तयार करण्यात येत आहेत. ७ रिंग रोड तयार करत आहोत. नरीमन पॉइंट ते कफ परेड, ऑरेंज गेट टनेल ते ईस्टर्न फ्री वे, कोस्टल रोड ते वरळी-शिवडी कनेक्टर, मुंबई ट्रान्स हार्बरलिंक आणि ईस्टर्न फ्री वे, जेव्हीएलआर, एससीएलआर, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, ठाणे बोरिवली रोड असे नेटवर्किंग तयार करण्यात येत आहे. तसेच ३३७ किलोमीटर लांबीचे मुंबई मेट्रो नेटवर्क तयार करण्यात येत आहे. अटल सेतू, सूर्या धरण एमएमआरडीएने बांधले असल्याची माहिती त्यांनी दिली. अटल सेतु ज्या ठिकाणी संपतो, त्या ठिकाणी तिसरी मुंबई बसविण्याचे काम एमएमआरडीए करणार आहे. एमएमआरडीए हे नियोजन प्राधिकरण आहे, रिजनल ट्रान्सपोर्ट प्लानर, रस्ते आणि मेट्रो नेटवर्क तयार करण्याचे काम प्राधिकरण करत आहे.

१० महिन्यांचा संसार, नवऱ्याचे अनैतिक संबंध, शेवटी टोकाचं पाऊल; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या

चोरीच्या संशयावरून १४ वर्षाच्या मुलासोबत राक्षसी कृत्य; लोखंडी बैलगाडीला बांधलं, खालून आग लावली, धुळ्यातील संतापजनक घटना

शाळा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी दिलासा देणार; शालेय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन; एसटी बस रद्द झाल्यास मिळणार तत्काळ मदत

ठाण्यातील मतदार यादीत घोळ; साडेचार लाख मतदार वाढले कसे? - मनसेचा आरोप; निवडणूक अधिकारी लग्नात व्यस्त

आज होणाऱ्या TET परीक्षेसाठी ४ लाख ७५ हजारांहून अधिक नोंदणी; गैरप्रकार रोखण्यासाठी CCTV सह Ai तंत्रज्ञानाचा वापर