मेघा कुचिक/मुंबई
माटुंगा येथील रेल्वे दंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवारी प्रवाशाला धावत्या लोकलमधून कथितरित्या ढकलून दिल्याने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील आरोपी अमजद सफ्रुद्दीन शेख याला २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मृत कैजटन डेनिस पेरिस (६२) हा पानाच्या टपरीवर काम करण्यासह विविध छोटी-मोठी कामे करायचा. वांद्रे जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी सांगितले, ‘आम्ही एका प्रत्यक्षदर्शीचा जबाब नोंदवला आहे. आरोपी दुपारी १.०७ वाजता लोअर परळ स्थानकातून लोकलमध्ये चढला, तर मृत माहिम स्थानकातून लोकलमध्ये चढला होता. लोकलमध्ये चढल्यानंतर मृताने आरोपीला तो आसनावर का बसला आहे, अशी विचारणा केली. संबंधित डबा दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर झटापटीत झाले. यावेळी दोघांनी एकमेकांचे शर्ट पकडले. ही घटना दरवाजाजवळ घडली. झटापटीदरम्यान आरोपीने मृताला लोकलमधून बाहेर ढकलल्याचा आरोप आहे.’’
मृताची धाकटी बहीण मारिया म्हणाली, ‘तो अतिशय जिद्दी होता. काही वर्षांपूर्वी गँगरीन झाल्याने त्याचा डाव्या पायाचा गुडघ्यापासून खालील भाग कापावा लागला होता. मात्र, त्यानंतरही त्याने जिद्द सोडली नाही आणि आपल्या इच्छेनुसार काम करत राहिला. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करून घ्यायची त्याची इच्छा होती.
तपासादरम्यान आरोपीने आपण अनाथ असून आपल्याला मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या असल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. मात्र, पेरिसच्या नातेवाइकांनी त्याच्या या दाव्यावर विश्वास नसल्याचे सांगितले. सहानुभूती मिळवण्यासाठी तो असा दावा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.