देवश्री भुजबळ / मुंबई
मुंबईतील अनेक भागांमध्ये हवेतील प्रदूषण निर्देशांक (एक्यूआय) मंगळवारीही २०० पेक्षा जास्त नोंदवला गेला. जो ‘खराब’ श्रेणीत मोडतो. शहराचा एकूण ‘एक्यूआय’ हा १७२ होता. सर्वाधिक खराब हवा माझगाव (२५२), चकाला-अंधेरी पूर्व (२५५), पवई (२२१), नेव्ही नगर-कुलाबा (२१६), बोरीवली पूर्व (२१९), मालाड (प.) (२१०) आणि इतर भागांमध्ये नोंदला गेला.
मुंबईत मंगळवारी अतिशय कमी दृश्यमानताही नोंदली गेली. मुंबईच्या पर्यावरण विभागाने यासाठी धुळीच्या प्रदूषणासह इथिओपियातील ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या राखेच्या ढगांच्या किरकोळ प्रभावाला कारणीभूत धरले आहे.
मुंबई मनपाने सर्वाधिक प्रदूषित भागांमध्ये ‘ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लान’ (ग्रॅप-५) अंतर्गत सकारात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. यात धुके फवारणी, पाण्याची फवारणी, सखोल स्वच्छता तसेच प्रदूषण करणाऱ्या बेकरी, औद्योगिक युनिट्स व बांधकामस्थळांवर कारवाई यांचा समावेश आहे.
सोमवारी ३०० च्या वर असलेला माझगावचा एक्यूआय होता. मनपाने प्रकल्पाचे काम थांबवून आणि धुक्याची फवारणी करून मंगळवारी २५२ पर्यंत खाली आला. भरारी पथकाला माझगावमध्ये रात्री बेकायदेशीरपणे चालणारी एक बेकरी आढळली. जी मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण करत होती. ती बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर वरळी आणि देवनार भागांमध्ये सखोल स्वच्छता मोहीम राबवल्याने एक्यूआय २०० च्या खाली आला, असे मुंबई मनपाच्या पर्यावरण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, धुरकट वातावरण आणि धुळीचे प्रदूषण यासह इथिओपियातील ज्वालामुखीमुळे निर्माण झालेल्या राखेच्या ढगांचा किरकोळ परिणाम दिसून आला. मात्र हवामान खात्याने या राखेच्या ढगांचा परिणाम संध्याकाळी ७.३० पर्यंत कमी होईल असे सांगितले आहे.दरम्यान, प्रदूषण करणाऱ्या बेकरी, औद्योगिक कंपन्या, बांधकामस्थळे आणि आरएमसी प्लांट्स यांनी २८ बिंदूंच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याने हवेतील प्रदूषण वाढत आहे. उघडपणे कचरा जाळणे थांबवण्यासाठी मुंबई मनपाने पोलिसांनाही गस्त ठेवण्यास सांगितले आहे.
...तर बांधकामे बंद करण्याचा विचार
मुंबईचे मनपा आयुक्त भूषण गगराणी म्हणाले, ‘ग्रॅप-४’ मधील सर्व नियम मुंबईला लागू होत नाहीत. सर्व बांधकामे तातडीने बंद केली जाणार नाहीत. प्रथम सकारात्मक उपाययोजना केल्या जातील. बांधकामे थांबवणे ही नकारात्मक उपाययोजना असून, सकारात्मक उपायांनी प्रदूषण कमी न झाल्यास पुढचे पाऊल म्हणून ती लागू करावी लागेल,” असे गगराणी म्हणाले.