मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) गुरुवार, ७ मे रोजी सहा तासांसाठी उड्डाण सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. मान्सूनपूर्व देखभाल कामांमुळे दुपारी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात एकही विमान उड्डाण घेणार नाही किंवा उतरवले जाणार नाही.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (MIAL)ने दिलेल्या माहितीनुसार, ही बंदी नियोजित असून यासाठी विमान कंपन्या आणि विमान वाहतूक अधिकाऱ्यांशी जवळपास सहा महिन्यांपूर्वीच समन्वय साधण्यात आला होता. त्यामुळे बहुतांश विमान कंपन्यांनी आपापल्या उड्डाण वेळापत्रकात बदल केले असले, तरी काही प्रवाशांना उड्डाण रद्द, उशीर किंवा मार्ग बदलाचा फटका बसू शकतो.
मान्सूनपूर्व देखभालीसाठी धावपट्ट्या बंद
दरवर्षी पावसाळ्याआधी विमानतळावरील धावपट्ट्यांची तपासणी आणि देखभाल केली जाते. याचाच भाग म्हणून ७ मे रोजी दोन्ही रनवे बंद ठेवून सविस्तर तपासणी केली जाणार आहे. १,०३३ एकर परिसरात पसरलेल्या विमानतळाच्या धावपट्ट्यांवर तांत्रिक पथकांकडून झीज, तडे आणि पावसाळ्यातील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पाहणी केली जाणार आहे. मुंबईतील मुसळधार पाऊस आणि पाणी साचण्याच्या समस्येमुळे मान्सूनपूर्व तपासणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
कोणत्या प्रवाशांना बसणार फटका?
दुपारी ११ ते सायंकाळी ५ या सहा तासांच्या कालावधीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. या वेळेत नियोजित उड्डाणे रद्द होऊ शकतात, उशिरा सुटू शकतात किंवा पुणे, अहमदाबाद, गोवा यांसारख्या जवळच्या विमानतळांकडे वळवली जाऊ शकतात. काही लांब पल्ल्याची उड्डाणे दिल्ली, बेंगळुरू किंवा चेन्नईमार्गे वळवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाचा सल्ला
विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या विमान उड्डाणाची स्थिती संबंधित एअरलाइनकडून किंवा CSMIAच्या अधिकृत वेबसाइटवर तपासून पाहण्याचा सल्ला दिला आहे.
सकाळी ११ पूर्वी किंवा सायंकाळी ५ नंतरची उड्डाणे असलेल्या प्रवाशांनाही अतिरिक्त वेळ राखून विमानतळावर पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण, सहा तासांच्या बंदीनंतर उड्डाणांची गर्दी वाढून वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.
उड्डाण रद्द झाल्यास काय कराल?
ज्या प्रवाशांची उड्डाणे रद्द झाली किंवा वेळेत बदल झाला, त्यांनी संबंधित एअरलाइनशी संपर्क साधून रिबुकिंग किंवा परताव्याबाबत माहिती घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
याआधीही उड्डाणांवर परिणाम
मार्च महिन्यात पश्चिम आशियातील हवाई क्षेत्रातील अडचणींमुळे मुंबई विमानतळावरील १७० हून अधिक उड्डाणांवर परिणाम झाला होता. त्यानंतर आता ७ मे रोजी होणारी ही नियोजित बंदी प्रवाशांसाठी आणखी एक मोठा बदल ठरणार आहे. मात्र, ही बंदी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.