पुनर्विकास टप्प्याटप्प्याने करा; मुंबईहून नवी मुंबईत विमानसेवा स्थलांतर, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र 
मुंबई

पुनर्विकास टप्प्याटप्प्याने करा; मुंबईहून नवी मुंबईत विमानसेवा स्थलांतर, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-१ (टी-१) चा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. विमानसेवांमध्ये व्यत्यय येऊ नये, यासाठी जुन्या टर्मिनलच्या जागी नवीन टर्मिनल उभारून पूर्ण होईपर्यंत सध्याची सुविधा सुरू ठेवावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-१ (टी-१) चा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. विमानसेवांमध्ये व्यत्यय येऊ नये, यासाठी जुन्या टर्मिनलच्या जागी नवीन टर्मिनल उभारून पूर्ण होईपर्यंत सध्याची सुविधा सुरू ठेवावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.

यासंदर्भात फडणवीस यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून पुनर्विकासाचा पर्यायी आराखडा सुचविला आहे. या आराखड्यानुसार, सध्याचे टर्मिनल पाडण्यापूर्वी नवीन टर्मिनल उभारण्यात येणार आहे.

विमानांचे स्थलांतर किंवा उड्डाणे रद्द करण्याची वेळ येऊ नये, यासाठी दोन्ही कामे समांतर पद्धतीने करण्याचा प्रस्ताव आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.

प्रस्तावित आराखड्यानुसार, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (सीएसएमआयए) टर्मिनल १बीचा विकास सर्वप्रथम करण्यात येईल.

त्यानंतर टर्मिनल १एमधील विमानसेवा १ बीमध्ये स्थलांतरित करण्यात येतील. पुढील टप्प्यात टर्मिनल १ए पाडून त्याची नव्याने उभारणी केली जाईल.

या प्रस्तावामुळे टर्मिनल बंद करून त्यानंतर नवीन बांधकाम सुरू करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करणे शक्य होईल.

१९६४ मध्ये सुरू झालेल्या टी-१ टर्मिनलचा पुनर्विकास प्रामुख्याने इमारतीच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबत आणि सुरक्षाविषयक त्रुटींबाबत उपस्थित झालेल्या चिंतांच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने यंदा २५ ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा काही भाग स्थलांतरित करण्याची प्रारंभी योजना आखली होती.

मात्र, स्थलांतराच्या नियोजनाबाबत विविध परदेशी विमान कंपन्यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर ही मुदत पुढे ढकलून मार्च २०२७ करण्यात आली.

प्रवासी क्षमता ५० लाखाने वाढणार

पुनर्विकासानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल-१ ची प्रवासी हाताळणी क्षमता वार्षिक १.५ कोटींवरून २ कोटी प्रवाशांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. याशिवाय प्रवासी प्रक्रिया, सुरक्षा तपासणी आणि अन्य पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. पुनर्विकसित टर्मिनल मार्च २०२९ पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मदर डेअरी, अमूल दूध महागले; प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू

Mumbai : दिवाळीत हवेचे 'दिवाळे'! नेव्ही नगरमध्ये AQI ४९७, तर शिवडीत ४५२ वर पोहोचला

राज्यात लवकरच समान नागरी कायदा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

नवी मुंबई सर्वाधिक स्वच्छ शहर; देशातील सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये पटकावला प्रथम क्रमांक

कोकण किनाऱ्यांचा जागतिक गौरव; गुहागर, लाडघर, श्रीवर्धन समुद्रतटांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा 'ब्ल्यू फ्लॅग' पुरस्कार