आंबेडकर जयंतीनिमित्त मध्यरात्री विशेष ट्रेन; CSMT-कल्याण व पनवेल मार्गावर अतिरिक्त गाड्या, वाचा वेळापत्रक  
मुंबई

आंबेडकर जयंतीनिमित्त मध्यरात्री विशेष ट्रेन; CSMT-कल्याण व पनवेल मार्गावर अतिरिक्त गाड्या, वाचा वेळापत्रक

आंबेडकर जयंतीनिमित्त मध्य रेल्वेकडून सीएसएमटी-कल्याण आणि सीएसएमटी-पनवेल मार्गांवर विशेष मध्यरात्री लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १४ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणावर अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर दाखल होतात. याच पार्श्वभूमीवर यंदा मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष मध्यरात्री लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य मार्ग (Main Line) आणि हार्बर मार्गावर (Harbour Line) विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

लोकल गाड्यांचे वेळापत्रक

सीएसएमटी-कल्याण विशेष गाडी रात्री १.३० वाजता सीएसएमटी येथून सुटून पहाटे ३ वाजता कल्याण येथे पोहोचेल. तर कल्याणहून सुटणारी गाडीही रात्री १.३० वाजता निघून पहाटे ३ वाजता सीएसएमटी येथे पोहोचणार आहे.

हार्बर मार्गावरील सीएसएमटी-पनवेल गाडी रात्री १.३० वाजता सुटून २.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल. तसेच पनवेलहून सुटणारी गाडीही रात्री १.३० वाजता निघून २.५० वाजता सीएसएमटी येथे पोहोचणार आहे.

BEST कडूनही अतिरिक्त बस सेवा

रेल्वेसोबतच बेस्ट प्रशासनानेही प्रवाशांसाठी अतिरिक्त बस फेऱ्यांची व्यवस्था केली आहे. दादर स्थानक ते शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी दरम्यान विशेष बस सेवा १४ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.०१ पासून रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे अनुयायांना प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

कडक सुरक्षा आणि सुविधा व्यवस्था

आंबेडकर जयंतीनिमित्त लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येण्याची शक्यता लक्षात घेता, कोकण विभागातील सर्व शासकीय यंत्रणांना कडक सुरक्षा आणि आवश्यक सुविधा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रेल्वे आणि बेस्ट प्रशासन एकत्रितपणे प्रवाशांच्या सुरळीत वाहतुकीसाठी समन्वय साधणार आहेत. याशिवाय, रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार असून, केंद्रीय नियंत्रण कक्ष उभारला जाणार आहे. तसेच सीसीटीव्ही देखरेख आणि मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

प्रशासनाच्या तयारीला वेग

कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत विविध यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. पोलिस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करून सुव्यवस्था राखावी, असे निर्देश देण्यात आले. तसेच, चैत्यभूमी परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी, तात्पुरते शौचालय आणि आरोग्य सेवांची योग्य व्यवस्था करण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

ऐतिहासिक कामगिरी! १० दिवसांचा अंतराळ प्रवास पूर्ण; आर्टेमिस-२चे अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित परतले, Video

Mira-Bhayandar : इंद्रलोक झोपडपट्टीत भीषण आग; ३ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक झोपड्या जळून खाक

Nanded : भावाच्या मृत्यूनंतर गर्भवती वहिनीशी दीराने केलं लग्न; गावकऱ्यांनी उचलला लग्नाचा खर्च

CSK vs DC, IPL 2026 : चेन्नई आज खाते उघडणार? दिल्लीविरुद्ध निर्णायक सामना; सॅमसन, ऋतुराजच्या कामगिरीकडे लक्ष

Mumbai : किरकोळ वादातून MBMT बसचालकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, CCTV फुटेज व्हायरल