Mumbai : बेस्ट बस अपघात मानवी चुकांमुळे; दादर, अंधेरी, मानखुर्द अपघातात चालक दोषी, कंत्राटदार मोकाट 
मुंबई

Mumbai : बेस्ट बस अपघात मानवी चुकांमुळे; दादर, अंधेरी, मानखुर्द अपघातात चालक दोषी, कंत्राटदार मोकाट

दादर, अंधेरी आणि मानखुर्द येथे घडलेल्या सलग बेस्ट बस अपघातांमागे कोणताही तांत्रिक बिघाड नसून चालकांची मानवी चूक, निष्काळजीपणा आणि अतिवेग हेच प्रमुख कारण असल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Swapnil S

मुंबई : दादर, अंधेरी आणि मानखुर्द येथे घडलेल्या सलग बेस्ट बस अपघातांमागे कोणताही तांत्रिक बिघाड नसून चालकांची मानवी चूक, निष्काळजीपणा आणि अतिवेग हेच प्रमुख कारण असल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत या तिन्ही अपघातांचा आढावा घेण्यात आला. मात्र, चालकांना दोषी ठरवताना बस पुरविणाऱ्या खासगी कंत्राटदारांच्या जबाबदारीवर मात्र ठोस भूमिका न घेतल्याने समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

मानखुर्द येथे सोमवारी झालेल्या भीषण अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला, एक जण गंभीर जखमी झाला, तर बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले. बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही बस उतारावर असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अपघातावेळी बसचा वेग जास्त होता. संबंधित बस पहाटे ४.१८ वाजता आगारातून बाहेर पडली होती आणि दिवसभराच्या फेऱ्यांमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आली नव्हती. तसेच १७ जुलै रोजी बसची संपूर्ण तांत्रिक तपासणी करण्यात आली होती आणि कोणताही दोष आढळला नव्हता.

यापूर्वी दादर येथील प्लाझा सिनेमाजवळ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसने अनेक वाहनांना धडक दिली होती. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले, तर २८ वर्षीय नियाज अहमद यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात चालकाने हँडब्रेक सोडल्यानंतर तत्काळ एक्सिलरेटर दाबल्याने अपघात झाल्याचा निष्कर्ष चौकशीत नोंदविण्यात आला आहे.

१० जुलै रोजी अंधेरी (आंबोली) येथे नॉन-एसी सिंगल डेकर बेस्ट बसने १४ वाहनांना धडक दिली होती. या अपघातात दोन जण जखमी झाले. या बसमध्येही कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. चालकाने वेळेत ब्रेक न दाबल्यामुळे बस वेगाने पुढे जाऊन वाहनांवर आदळल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले.

विशेष म्हणजे या तिन्ही बस खासगी कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर चालवल्या जात होत्या. तरीही प्राथमिक चौकशीत संपूर्ण जबाबदारी चालकांवर टाकण्यात आली असून कंत्राटदारांच्या उत्तरदायित्वाबाबत स्पष्ट भूमिका न घेतल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

कंत्राटदारांवर कारवाईची मागणी

बेस्ट समिती सदस्य अजय सिंह यांनी मानखुर्द अपघातातील बस मातेश्वरी कंपनीची असल्याचे सांगत, या कंपनीच्या बसेसचे अपघात वारंवार होत असल्याचा आरोप केला. काही चालकांकडून रात्रभर सीएनजी बसवर ड्युटी करून पुन्हा सकाळी दुसऱ्या बसवर काम करून घेतले जात असल्याचा गंभीर आरोप करत, अशा जीवघेण्या ओव्हरटाइमला तातडीने आळा घालावा आणि संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI पेमेंटला शुल्क लागू; २००० रु.हून अधिक - ०.४ टक्के शुल्क, २००० पर्यंत - मोफत

शिवसेना फूटप्रकरणी घटनेचे उल्लंघन नाही; एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा दावा

दिघीमध्ये जहाजबांधणी; भारतातील सर्वात मोठा प्रकल्प रायगडमध्ये, माझगाव डॉकची २७ हजार कोटींची गुंतवणूक

BEST बसचालकांची बेदरकारी वाढली; ८९८ जणांवर कारवाई, पैकी ७८९ कंत्राटी चालक, पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Mumbai : गोरेगावात बेस्टच्या बसचा अपघात; २ जण जखमी, Video