पूनम पोळ/ मुंबई : मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये ॲक्वा लाईन मेट्रोची एंट्री झाल्यामुळे बेस्टच्या प्रवाश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. विशेषत: कमी अंतराच्या मार्गांवरील प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, बेस्ट प्रशासन प्रवाशांना पुन्हा बेस्ट बसकडे वळवण्यासाठी अधिकच्या गाड्या सोडण्याच्या विचारात असल्याची माहिती बेस्ट अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी वाहतूक व्यवस्थेमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. मुंबईमध्ये ॲक्वा लाईन ८ ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. यापूर्वी १० मेपासून बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ते आचार्य अत्रे चौक (वरळी) या दरम्यान वाहतूक सुरू झाली होती. या वाहतुकीमुळे गेल्या महिन्यात प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे बेस्टचे आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी बेस्ट प्रशासनाच्या वतीने बेस्ट प्रवाशांना बेस्टकडे पुन्हा वळविण्यासाठी अभ्यास सुरू आहे. आणि येत्या काही दिवसात बेस्टच्या अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत.
दक्षिण मुंबईतील ५० टक्के प्रवासी घटले
मेट्रो-३ मुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉइंट/कफ परेड मार्गावर बेस्टची प्रवासी संख्या ५० टक्क्याने घटली आहे. अशा परिस्थितीत बेस्टने फीडर बस सेवांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, जेणेकरून या आर्थिक अडचणीत असलेल्या उपक्रमाला अधिक प्रवासी आणि महसूल मिळू शकेल. अशी माहिती बेस्ट अधिकाऱ्यांनी दिली.
बेस्टमध्ये सध्याचा बदल
बेस्ट प्रशासनाने १ नोव्हेंबर रोजी २३ प्रमुख मार्गांवर कनेक्टिव्हिटी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी वातानुकूलित बसेसच्या ताफ्यात वाढ केली आहे. या बदलांचा भाग म्हणून, वर्ल्ड ट्रेड सेंटर (कफ परेड) आणि सीएसएमटी दरम्यान ‘ए-१०१’ ही नवीन वातानुकूलित सेवा सुरू करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, आठ मार्गांवर केवळ वातानुकूलित बसेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ॲक्वा लाईनमुळे सुखकर प्रवास
बससाठी थांब्यावर बराच वेळ थांबावे लागत होते. गर्दीतून धक्काबुक्की करून प्रवास करावे लागत होते. परंतु ॲक्वा लाईन सुरू झाल्यापासून प्रवास सुखकर होत आहे. मंत्रालय ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचा प्रवास सुखकर होत आहे, असे अनिल सौंदाळे या प्रवाशाने सांगितले.
सिटीफ्लो फीडर बससेवेमुळेही बेस्ट डबघाईत
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सिटीफ्लो या खासगी कंपनीसोबत मिळून मेट्रो लाईन ३ (ॲक्वालाईन) साठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि वरळी स्टेशनवर विशेष फीडर बस सेवा सुरू केली आहे. मात्र, मुंबईकरांची सेकंड लाईफलाईन असलेल्या बेस्ट बसला जाणूनबुजून डावलले आहे. त्यामुळे बेस्टच्या महसूलातील घट वाढली आहे. परंतु, प्रवाशांना परत आणण्यासाठी अभ्यास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.