Mumbai : छठपूजेनिमित्त बेस्टची विशेष बससेवा; जुहू बीचवर जाण्यासाठी २२ अतिरिक्त बस, जाणून घ्या मार्ग अन् वेळ 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : छठपूजेनिमित्त बेस्टची विशेष बससेवा; जुहू बीचवर जाण्यासाठी २२ अतिरिक्त बस, जाणून घ्या मार्ग अन् वेळ

रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शहरातील विविध भागांतून १५ अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : छठपूजेनिमित्त जुहू बीचवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने विशेष बससेवेचे नियोजन केले आहे. १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांत एकूण २२ अतिरिक्त बस सोडण्यात येणार असून, या बस सांताक्रूझ, अंधेरी आणि बोरिवली रेल्वे स्थानकांसह विविध बस डेपोंना जुहू बीचशी जोडणार आहेत. भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा आणि गर्दीचे नियोजन व्यवस्थित करता यावे, यासाठी बेस्टकडून अतिरिक्त कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात येणार आहे.

१५ नोव्हेंबरला जुहू बीचसाठी १५ अतिरिक्त बस

रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शहरातील विविध भागांतून १५ अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये सांताक्रूझ, अंधेरी आणि बोरिवली रेल्वे स्थानकांवरून जुहू बीचपर्यंत विशेष बससेवा उपलब्ध असेल.

  • मार्ग क्रमांक २३१ : सांताक्रूझ पश्चिम रेल्वे स्थानक ते जुहू बीच या मार्गावर दुपारी २ वाजल्यापासून ४ अतिरिक्त बस धावतील.

  • मार्ग क्रमांक २०३ : अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानक ते जुहू बीच या मार्गावर सायंकाळी ६ वाजल्यापासून ३ बस सोडण्यात येतील.

  • मार्ग क्रमांक ए-२०३ : बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकातून दुपारी ३ वाजल्यापासून ३ बस चालवण्यात येतील.

  • मार्ग क्रमांक ए-२५६ : जुहू बस स्थानक ते मालवणी डेपो या मार्गावर दुपारी २ वाजल्यापासून ३ बस धावतील.

  • मार्ग क्रमांक ३३९ : जुहू बस स्थानक ते माजास डेपो या मार्गावर दुपारी ४ वाजल्यापासून २ अतिरिक्त बस उपलब्ध असतील.

१६ नोव्हेंबरला परतीच्या प्रवासासाठीही विशेष व्यवस्था

छठपूजा आटोपल्यानंतर भाविकांना घरी परतण्यासाठीही बेस्टने अतिरिक्त बसची व्यवस्था केली आहे. सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी पहाटे ६ ते सकाळी ७.३० या वेळेत ७ अतिरिक्त बस चालवण्यात येणार आहेत. यामध्ये बोरिवलीहून ३, सांताक्रूझहून २ आणि अंधेरीहून २ बस उपलब्ध असतील. या बस भाविकांना संबंधित रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचवतील.

गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात

जुहू बीच, जुहू बस स्थानक आणि सांताक्रूझ रेल्वे स्थानक येथे गर्दीचे नियोजन करण्यासाठी बेस्टचे निरीक्षक तैनात असतील. याशिवाय १५ नोव्हेंबर रोजी दुपारपासून १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत एक सुरक्षा अधिकारी, एक हवालदार आणि दोन सुरक्षा रक्षक कर्तव्यावर असतील. तसेच बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून जुहू बीचवर ब्रेकडाऊन व्हॅनही तैनात ठेवण्यात येणार आहे.

प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन

प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन गरजेनुसार आणखी अतिरिक्त बस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जुहू बीच परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि भाविकांचा प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा, यासाठी बेस्टने सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम; सुप्रिया सुळे यांच्या स्पष्टोक्तीने चित्र स्पष्ट

KEM रुग्णालयात लिफ्ट बंदचे संकट कायम; रुग्णांच्या स्थलांतरानंतर उपचारात अडचणी, ऑर्थोपेडिक विभागाकडून रुग्णांची विभागणी

चिपी-नवी मुंबई विमानसेवा सोमवारपासून नियमित; आठवड्यातील सातही दिवस उड्डाणे; सिंधुदुर्गच्या पर्यटन आणि रोजगाराला मिळणार चालना

Bhayandar : जमिनीबाबत माहिती नाही; वोरांच्या जमीन प्रकरणात मेरवीन फर्नांडिस यांचा पोलिसांना जबाब

'खरे भाजपचे आहात का ? आधी डीएनए टेस्ट करा!' आमदार मंदा म्हात्रे यांचा गणेश नाईक यांचे नाव न घेता निशाणा