'एआय'ने बनविलेली प्रतिमा प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : भांडुपमधील लग्नाच्या रिसेप्शनमध्ये थरार! लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरून थेट बेसमेंटमध्ये कोसळली; एकच गोंधळ, अनेकजण जखमी

लग्नाच्या रिसेप्शनच्या पाहुण्यांनी भरलेली लिफ्ट अचानक तिसऱ्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. एका जखमी महिलेच्या पतीने 'स्टार बँक्वेट' हॉलच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केलेत. “इतकी मोठी दुर्घटना घडूनही हॉलच्या मालकाने आमची साधी विचारपूसही केली नाही. केवळ लिफ्ट देखभाल कंपनी नव्हे, तर संबंधित सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

Krantee V. Kale

मुंबई: भांडुप पश्चिमेतील पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या 'स्टार बँक्वेट' हॉलमध्ये रविवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. लग्नाच्या रिसेप्शनच्या पाहुण्यांनी भरलेली लिफ्ट अचानक तिसऱ्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत किमान चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे.

या प्रकरणी वर्षा सुषांत गुरखे (वय ३४) यांच्या पतीने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वर्षा सध्या भांडुपमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. वर्षा या एलबीएस रोडवरील शांतिनिकेतन सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहतात आणि पवईतील एल अँड टी कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. १ फेब्रुवारी रोजी स्टार बँक्वेट हॉलमध्ये त्यांचा सहकारी व मित्र प्रतिक (Pratik Gondbade) यांच्या लग्नाचा रिसेप्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर वर्षा आणि त्यांचे पती सुषांत घरी जाण्यासाठी निघाले होते.

७ ते ८ जण लिफ्टमध्ये, पती बाहेरच थांबले

तिसऱ्या मजल्यावरून खाली उतरण्यासाठी वर्षा या सात ते आठ जणांसह लिफ्टमध्ये चढल्या. जागा कमी असल्याने त्यांचे पती सुषांत बाहेरच थांबले. लिफ्ट खाली जात असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि काही क्षणांतच लिफ्ट प्रचंड वेगाने थेट तळघरात कोसळली.

बेसमेंटमध्ये धाव, आरडाओरड

लिफ्ट कोसळल्याचा जोरदार आवाज ऐकताच सुषांत गुरखे आणि इतरांनी बेसमेंटकडे धाव घेतली. आत अडकलेले लोकं मदतीसाठी ओरडत होते. एकच गोंधळ उडाला होता. काही वेळानंतर लिफ्टचे दरवाजे उघडण्यात आले आणि जखमींना बाहेर काढण्यात आले.

दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कारवाई, पोलिसांची माहिती

वर्षा गुरखे यांच्यासह तीन ते चार जणांना भांडुपमधील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षा यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून गुडघ्याजवळ फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक स्वरूपात लिफ्टच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले,
“तपासानंतर दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल.”

हॉलच्या मालकाकडून साधी विचारपूसही नाही, सर्वांवर कठोर कारवाई करा

दरम्यान, जखमी वर्षा यांचे पती सुषांत गुरखे यांनी बँक्वेट हॉलच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. “इतकी मोठी दुर्घटना घडूनही हॉलच्या मालकाने आमची साधी विचारपूसही केली नाही. पत्नीच्या उपचारांसाठी आम्ही रुग्णालयांमध्ये धावपळ करत आहोत. हा अपघात जीवघेणा ठरू शकला असता. केवळ लिफ्ट देखभाल कंपनी नव्हे, तर संबंधित सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

कागदपत्रांची तपासणी सुरू

पोलीस सूत्रांनी सांगितले की, लिफ्टची देखभाल, नियमित सुरक्षा तपासणी आणि परवानग्यांशी संबंधित कागदपत्रे मागवण्यात आली असून, नेमकी जबाबदारी कोणाची आहे याचा सखोल तपास सुरू आहे. तपासाअंती पुढील कारवाई केली जाणार आहे.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये