मुंबई : मुंबई शहरात डबलडेकर बसेस धावत असून उपनगरातही त्या प्रवासी सेवेत दाखल झाल्या. बीकेसी-कुर्ला मार्गावर धावणाऱ्या डबलडेकरना उंचीमुळे ब्रेक लागला असून या मार्गावर आता एक मजली बसेस चालवण्याची वेळ बेस्ट उपक्रमावर आली आहे.
बेस्टने २०२२ मध्ये २०० विद्युत डबलडेकर बस खरेदीचे कंत्राट दिले होते. मात्र, त्यापैकी आतापर्यंत केवळ ५० बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. विविध तांत्रिक आणि कराराशी संबंधित कारणांमुळे गेली तीन वर्षे रखडलेल्या बेस्टच्या १५० विद्युत डबलडेकर बस आता उंचीच्या नव्या पेचात अडकल्या आहेत. नव्या बसेसची उंची विद्यमान डबलडेकर बसेसपेक्षा तब्बल १७ सेंमीने अधिक असल्याने बीकेसी-कुर्ला या सर्वाधिक प्रवासी वाहतूक असलेल्या मार्गावर त्या चालवणे अशक्य ठरत आहे. परिणामी या मार्गावर डबलडेकरऐवजी एकमजली बस चालवण्याची वेळ बेस्ट उपक्रमावर आली आहे.
रखडलेल्या १५० बसेसचा वाद ॲॅटर्नी जनरल यांच्यापर्यंत पोहोचला होता. त्यानंतर तांत्रिक समितीने कराराच्या अटींची तपासणी करून केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार किंमतीतील किरकोळ बदलास मंजुरी देण्याची शिफारस केली. या प्रक्रियेनंतर उर्वरित १५० बस लवकरच सेवेत दाखल होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
मात्र आता नव्या बसेसच्या उंचीमुळे आणखी एक अडथळा निर्माण झाला आहे. सध्या सेवेत असलेल्या डबलडेकर बसेसची उंची ४५८ सेंमी आहे, तर नव्याने येणाऱ्या बसेसची उंची ४७५ सेंमी आहे. त्यामुळे विशेषतः चेंबूर-सांताक्रूझ जोडरस्त्यावरून आणि बीकेसी-कुर्ला परिसरातून बस चालविताना उंचीचा प्रश्न निर्माण होत आहे.
सर्वाधिक प्रवासी वाहतूक असलेला बेस्टचा मार्ग क्रमांक ३१० हा उंचीच्या मर्यादांमुळे नवीन डबलडेकर बस चालविणे शक्य नसल्याने बेस्टला एकमजली बसेसचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना अपेक्षित अतिरिक्त आसनक्षमता आणि डबलडेकर सेवेचा लाभ मिळण्यास विलंब होणार आहे.
पर्यटकांसाठी पाच ओपन बसेस
दरम्यान, मुंबईकर आणि पर्यटकांसाठी आनंदाची बाब म्हणजे या १५० डबलडेकर बसेसपैकी पाच बसेस ओपन डेक प्रकारातील असणार आहेत. दक्षिण मुंबईतील पर्यटनस्थळांची सफर घडविण्यासाठी या बसेसचा वापर करण्यात येणार आहे. पूर्वी ओपनडेक बससेवेला मोठा प्रतिसाद मिळत होता आणि केवळ शनिवार-रविवार या दोन दिवसांत बेस्टला सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. नव्या ओपन डेक बसमुळे बेस्टच्या महसुलात भर पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.