मुंबई : मुंबई हे देशातील सर्वाधिक ई-कचरा निर्माण करणाऱ्या शहरांपैकी एक आहे. मुंबईमध्ये ई-कचऱ्याच्या वैज्ञानिक व्यवस्थापनासाठी, पर्यावरण संरक्षणासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ई कचरा व्यवस्थापन धोरण महत्त्वपूर्ण आहे. भाजपचे नगरसेवक तेजिंदर तिवाना यांनी या मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला सभागृहाची मंजुरी मिळाली आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ई-कचरा निर्माण होतो. मोबाईल, संगणक, लॅपटॉप, बॅटऱ्या आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे व त्यांची वारंवार होणारी अदलाबदल यामुळे ई-कचऱ्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली. ई-कचऱ्यामधील लिथियम बॅटऱ्या, सर्किट बोर्ड आणि इतर धोकादायक घटकांमुळे जमीन, पाणी आणि हवा प्रदूषित होत असून, कचरा डेपोमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची गंभीर बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या विषारी घटकांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही दीर्घकालीन दुष्परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर मनपाने ई-कचऱ्याच्या वैज्ञानिक विल्हेवाटीसाठी स्वतंत्र धोरण तयार करावे, अधिकृत ई-कचरा संकलन केंद्रांचे जाळे उभारावे, अधिकृत पुनर्प्रक्रिया संस्थांशी समन्वय साधावा तसेच नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती अभियान राबवावे, अशी सूचना तेजिंदरसिंग तिवाना यांनी सभागृहात मांडली होती. सभागृहाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाला ई-कचरा व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्याचे, त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.