मुंबईतील ४३ बेकऱ्यांना BMC ने टाळे ठोकले; स्वच्छ इंधनाचा वापर न केल्याने परवाने रद्द संग्रहित छायाचित्र
मुंबई

मुंबईतील ४३ बेकऱ्यांना BMC ने टाळे ठोकले; स्वच्छ इंधनाचा वापर न केल्याने परवाने रद्द

मुंबईतील वायुप्रदूषणाला हातभार लावणाऱ्या लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या बेकरींविरोधात मुंबई महापालिकेने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. न्यायालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार मुदत देऊनही पर्यावरणपूरक इंधनाचा वापर न करणाऱ्या ४३ बेकरींचे परवाने महापालिकेने रद्द केले आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील वायुप्रदूषणाला हातभार लावणाऱ्या लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या बेकरींविरोधात मुंबई महापालिकेने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. न्यायालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार मुदत देऊनही पर्यावरणपूरक इंधनाचा वापर न करणाऱ्या ४३ बेकरींचे परवाने महापालिकेने रद्द केले आहेत. त्यामुळे या बेकरींना सध्या टाळे लागले आहे. विशेष म्हणजे, संबंधित बेकरी चालकांनी स्वच्छ इंधनाचा पर्याय स्वीकारल्यास त्यांना पुन्हा परवाना मिळू शकणार आहे.

लाकूड आणि कोळसा जाळून बेकरीमध्ये पाव, ब्रेड आणि अन्य खाद्यपदार्थ तयार केले जातात. अनेक ठिकाणी दुय्यम दर्जाचे लाकूड तसेच जुन्या फर्निचरचाही इंधन म्हणून वापर केला जातो. यामुळे हवेत धोकादायक वायू आणि सूक्ष्म प्रदूषक कण मिसळतात. परिणामी, श्वसनाचे विकार, फुफ्फुसांचे आजार आणि हृदयविकारांचा धोका वाढतो. मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर या प्रकारच्या इंधनाच्या वापरावर नियंत्रण आणण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.

मुंबई उच्च न्यायालयाने ९ जानेवारी २०२५ रोजी आदेश देऊन लाकूड आणि कोळशावर आधारित व्यावसायिकांना ८ जुलै २०२५ पर्यंत कायमस्वरूपी स्वच्छ इंधनाचा पर्याय स्वीकारण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर न्यायालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही मुदतवाढ देण्यात आली. मात्र, अनेक बेकरी चालकांनी या निर्देशांकडे दुर्लक्ष केले. अखेर मुंबई महापालिकेने ऑक्टोबर २०२६ पर्यंत अंतिम मुदत देत नियमांचे पालन न करणाऱ्या बेकरींवर कारवाईचा इशारा दिला होता.

५३३ बेकरींनी पर्यावरणपूरक इंधन स्वीकारले

मुंबईत एकूण ५९३ बेकरी आहेत. या बेकऱ्यातून मुंबईकरांना दैनंदिन पाव, बिस्कीट, नानकटाई आदींचा पुरवठा केला जातो. या बेकऱ्या पूर्वी लाकडावर चालत होत्या. त्यामुळे शहरात प्रदूषणाचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे जनतेचा श्वास कोंडला जात होता. महापालिकेने बेकऱ्यांवर कठोर कारवाई केली.

त्यापैकी ५३३ बेकरींनी इलेक्ट्रिक शेगडी किंवा अन्य पर्यावरणपूरक इंधनाचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र, उर्वरित ६० बेकरींनी स्वच्छ इंधनाकडे वळण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. यातील १७ बेकरी चालकांनी व्यवसाय परवडत नसल्याचे कारण देत स्वतःहून व्यवसाय बंद केला, तर उर्वरित ४३ बेकरींचे परवाने महापालिकेने रद्द केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मदर डेअरी, अमूल दूध महागले; प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू

Mumbai : दिवाळीत हवेचे 'दिवाळे'! नेव्ही नगरमध्ये AQI ४९७, तर शिवडीत ४५२ वर पोहोचला

राज्यात लवकरच समान नागरी कायदा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

नवी मुंबई सर्वाधिक स्वच्छ शहर; देशातील सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये पटकावला प्रथम क्रमांक

कोकण किनाऱ्यांचा जागतिक गौरव; गुहागर, लाडघर, श्रीवर्धन समुद्रतटांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा 'ब्ल्यू फ्लॅग' पुरस्कार