मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेने इकोफ्रेंडली कलरचे वाटप करण्यावर भर दिला आहे. मुंबईतील गणेश मूर्तिकरांना तीन हजार लिटर रंगाचे वाटप करण्यात आल्याचे पालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून सांगण्यात आले.
यंदा १४ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबईतील १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे. गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाकडून रंगांचे वाटप करण्यात आले आहे. महापालिकेच्या २६ वॉर्ड कार्यालयांमार्फत गणेश मूर्तिकारांना भगवा, लाल, निळा, काळा, पिवळा आणि हिरवा अशा सहा रंगांचे वितरण करण्यात आले आहे.
महापालिकेच्या २४ जुलै २०२६ रोजीच्या पत्रकानुसार प्रत्येक रंगाचे ५०० लिटर, म्हणजेच सहा रंग मिळून एकूण ३,००० लिटर रंग गणेश मूर्तिकारांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देताना गणेशमूर्तींना वापरण्यात येणाऱ्या रंगांमधून पर्यावरणाला होणारे संभाव्य नुकसान कमी करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
रंगनिहाय वाटप
भगवा - ५०० लिटर
लाल - ५०० लिटर
निळा - ५०० लिटर
काळा - ५०० लिटर
पिवळा - ५०० लिटर
हिरवा - ५०० लिटर
एकूण - ३,००० लिटर रंगाचे वाटप