मुंबई

मुंबई अधिक चांगली बनविण्यासाठी... द फ्री प्रेस जर्नल आयोजित चर्चेत रहिवाशांचा सहभाग

दहा वर्षांनंतर होत असलेल्या २०२६ च्या मुंबई महापालिका (बीएमसी) निवडणुकीस ११ दिवस उरले असताना, प्रचाराला आता पूर्णपणे सुरुवात होण्याची तयारी झाली आहे. सत्तेसाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू असली तरी नागरिकांना केवळ आश्वासने नव्हे, तर ठोस कृती आणि जबाबदारी हवी आहे. त्यामुळे अनेक नागरी कार्यकर्ते आज मुंबईकरांचा आवाज बनले आहेत.

Swapnil S

देवश्री भुजबळ / मुंबई

दहा वर्षांनंतर होत असलेल्या २०२६ च्या मुंबई महापालिका (बीएमसी) निवडणुकीस ११ दिवस उरले असताना, प्रचाराला आता पूर्णपणे सुरुवात होण्याची तयारी झाली आहे. सत्तेसाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू असली तरी नागरिकांना केवळ आश्वासने नव्हे, तर ठोस कृती आणि जबाबदारी हवी आहे. त्यामुळे अनेक नागरी कार्यकर्ते आज मुंबईकरांचा आवाज बनले आहेत.

या पार्श्वभूमीवर 'द फ्री प्रेस जर्नल'ने शुक्रवार, २ जानेवारी रोजी नरिमन पॉइंट येथील कार्यालयात टाऊनहॉल चर्चेचे आयोजन केले. या कार्यक्रमात विविध भागांतील कार्यकर्ते, नागरी नेते आणि रहिवासी सहभागी झाले. चर्चेचा केंद्रबिंदू एकच होता-'मुंबई अधिक चांगली कशी बनवता येईल ?' अनेक मुद्द्यांवर यावेळी सखोल चर्चा झाली.

'द फ्री प्रेस जर्नल'ने आयोजित केलेल्या चर्चेत कुलाबा, कफ परेड, नेपियन सी रोड, लोखंडवाला-ओशिवरा, गोवंडी आदी भागांतील रहिवासी संघटनांचे प्रतिनिधी तसेच दादर, माटुंगा, वांद्रे, कुर्ला आदी परिसरातील १५ हून अधिक नागरी व पर्यावरण कार्यकर्ते सहभागी झाले होते.

तक्रार करण्याऐवजी वॉर्डनिहाय उपायांसाठी लढा दिला पाहिजे, असे मत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केले.

कार्यकर्ते कमलाकर शेनॉय म्हणाले, राजकारण्यांनाच नव्हे, तर आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनाही कर्तव्यच्युती आणि मूलभूत नागरी नियमांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल जाब विचारला पाहिजे. 'विविध वादग्रस्त मुद्दे असले तरी, चार वर्षांनंतर मुंबईला पुन्हा एकदा घटनात्मक संस्था मिळणार आहे. लोकप्रतिनिधींना जबाबदार धरण्यासाठी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे,' असे कार्यकर्ते व वकील त्रिवेणी कुमार कनांनी यांनी सांगितले.

क्लीन अँड हेरिटेज कोलाबा रेसिडेंट्स असोसिएशन (सीएचसीआरए) चे परवेज कूपर म्हणाले, कोलाबा कॉजवेवर कॅफे मॉन्डेगरपासून भंजन मंदिरापर्यंत बेकायदेशीर फेरीवाल्यांचा इतका त्रास झाला आहे की चालण्यासाठीही जागा उरलेली नाही. राजकारण्यांनी हा परिसर पूर्णपणे बिघडवला आहे. पूर्वी ७९ फेरीवाले होते, आज ही संख्या २८५ वर पोहोचली आहे. अपोलो बंदर येथे होणाऱ्या जेट्टीविरोधात आम्ही न्यायालयातही लढा दिला आहे. ती जेट्टी आणखी त्रासदायक ठरणार आहे.

कफ परेड रेसिडेंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा आणि वॉर्ड २२५ मधील अपक्ष उमेदवार डॉ. लॉरा डी' सूझा म्हणाल्या, वाहतूक समस्येबरोबरच समुद्रात बेकायदेशीर भराव वाढत आहे आणि प्रशासन डोळेझाक करत आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरमागील ३३ एकर मॅन्ग्रोव्ह नष्ट करण्यात आले आहेत. मंत्री महापालिका, सागरी पोलीस यांना पत्रे लिहूनही कोणतीही कारवाई झाली नाही.

शिंदे सेनेच्या युवा सेनेच्या 'अॅनिमल वेल्फेअर फोर्स'चे अध्यक्ष संकेत भट्ट म्हणाले, सुसंवादी समाजाच्या आणि समतोल विकासासाठी माणसांप्रमाणेच प्राण्यांचे हक्कही महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी पुढाकार घेऊन वास्तव समजून घेतले पाहिजे. प्राणी, त्यांना अन्न देणारे नागरिक यांचा अधिकृत डेटाबेस तयार करण्यासारख्या मूलभूत गोष्टींपासून सुरुवात केली पाहिजे. वॉर्ड २२५ मधील अपक्ष उमेदवार स्नेहा विसारिया म्हणाल्या, निवडणुकीच्या तोंडावर कबुतरांमुळे श्वसनविकार होतात असा प्रचार सुरू झाला आहे. सर्व कबुतरखाने मोक्याच्या जागी असल्याने राजकारण्यांचे यात स्वार्थी हितसंबंध आहेत. माणसे प्राण्यांपेक्षा अधिक क्रूर आहेत.

लोखंडवाला ओशिवरा सिटिझन्स असोसिएशनचे संस्थापक धवल शाह म्हणाले, अंधेरी मुंबईतील सर्वाधिक कर भरणारा वॉर्ड बनेल; तरीही येथील जीवनमान तितकेसे चांगले नाही. रस्ते खोदकाम आणि पूल प्रकल्प दशकानुदशके सुरू आहेत. काही रस्ते आणि चौक विनाकारण विकसित केले जातात, कदाचित ठेकेदारांच्या फायद्यासाठी. तर गोखले पुलासारखा महत्त्वाचा पूल पूर्ण व्हायला वर्षानुवर्षे आंदोलन करावे लागले. तोही सुरुवातीला दोन मीटरची फट ठेवून बांधण्यात आला, यावरून कामाची गुणवत्ता दिसून येते.

गोवंडी सिटिझन्स वेल्फेअर फोरमचे शेख फैयाज आलम म्हणाले, एम-ईस्ट वॉर्डचा मानवी विकास निर्देशांक सर्वांत कमी आहे. जैववैद्यकीय कचरा प्रकल्प हलवण्यासाठी आम्ही न्यायालयात लढा दिला, तरी देवनार डम्पिंग ग्राउंडमुळे येथे प्रदूषण सर्वाधिक आहे. गोवंडी हा मुंबईतील सर्वाधिक दुर्लक्षित भाग आहे. येत्या बीएमसी निवडणुकीत आम्हाला पारदर्शकता हवी आहे. अधिकारी आणि राजकारण्यांवर नागरिकांचा सामूहिक दबाव मुंबईत दिसत नाही. 'मीट युवर कॅन्डिडेट' सारखी व्यवस्था पुन्हा सुरू झाली पाहिजे, असे मत पिटीशन ग्रुपचे सदस्य डॉ. गौरांग वोरा यांनी मांडले.

मुंबई सिटिझन्स फोरमचे मारिओ फिशरी म्हणाले, जबाबदारी आणि माहितीपूर्ण निर्णय हे सर्वात महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी १९६० आणि १०० या क्रमांकांवर तक्रारी नोंदवाव्यात.

Mumbai : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा अन् नववर्षाचा जल्लोष; मुंबई, ठाणे, डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रा

Air Travel Alert : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' ४ विमानतळांवर बंदी; फ्लाइट्सवर होणार परिणाम

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

Nagpur : मॅट्रिमोनियल साईटवरील ओळख महागात पडली; मॉर्फ अश्लील व्हिडिओने ३६ वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल

भिवंडीत फर्निचर मार्केटला भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली