मुंबई

BMC Elections 2026: 'व्होटर स्लिप्स'चा गोंधळ; अनेक मतदार मतदान न करताच परतले

मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या तपशीलांमध्ये विसंगती आणि व्होटर स्लिप्सचा अभाव यामुळे मतदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक मतदारांना मतदान न करताच घरी परतावे लागत आहे. रांगेत उभे राहूनही मतदान न करता आल्यामुळे मतदार नाराजीही व्यक्त करीत आहेत.

Krantee V. Kale

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली असताना मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या तपशीलांमध्ये विसंगती आणि व्होटर स्लिप्सचा अभाव यामुळे मतदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक मतदारांना मतदान न करताच घरी परतावे लागत आहे. रांगेत उभे राहूनही मतदान न करता आल्यामुळे मतदार नाराजीही व्यक्त करीत आहेत.

ऑनलाइन मतदार माहिती आणि बूथवरील नोंदी यामध्ये तफावत असल्याने मतदान न करता परतावे लागल्याचे एका मुंबईकराने सांगितले. “इंटरनेटवर दाखवलेला क्रमांक इथे जुळत नाही. ही निव्वळ व्यवस्थात्मक चूक आहे. एवढा वेळ रांगेत उभं राहूनही मला मतदान न करताच परतावं लागत आहे,” असे त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.

मतदान केंद्रांवर विलंब, मतदारांचा संताप

याच मुद्द्यावरून प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचे बंधू अविनाश गोवारीकर यांनीही नाराजी व्यक्त केली. ते सकाळी लवकर मतदानासाठी आले होते. एकूण व्यवस्था समाधानकारक असली तरी व्होटर स्लिप्सच नसल्यामुळे अनावश्यक विलंब होत असल्याचे ते म्हणाले. “मी मतदान केलं. सर्व ठिक आहे, गैरसोय नाही. पण व्होटर स्लिप्सच नसल्यामुळे लोकांना आपला क्रमांक शोधायला वेळ लागतोय. त्यामुळे प्रत्येक मत टाकायला साधारण पाच मिनिटं लागत आहेत,” असे ते म्हणाले.

उत्साह ओसरला, मतदार परतले

गोवारीकर यांनी पुढे म्हटले की, “लोक खूप उत्साहाने आले होते. पण लांब रांगा आणि गोंधळ पाहून अनेक जण परत जात आहेत. यंदा राजकीय पक्षांनी व्होटर स्लिप्स का दिल्या नाहीत हे समजत नाही. हीच मोठी समस्या आहे,” असे त्यांनी नमूद केले.

नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही नाराजी

मुंबईशिवाय नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतूनही अनेक नागरिकांनी अशीच तक्रार केली आहे. एकाच इमारतीत राहून एकाच कुटुंबातील सदस्यांची नावं वेगवेगळ्या ठिकाणी आल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. नवी मुंबईत तर खुद्द वनमंत्री गणेश नाईक यांनाच मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी एक तास धावपळ करावी लागली.

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

मतदानानंतर लगेच पुसली जाते बोटावरची शाई; मनसेच्या महिला उमेदवाराचा दावा; काँग्रेसच्या सचिन सावंतांनी तर प्रात्यक्षिकच दाखवलं - Video

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले

BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद?

BMC Election : राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटचे सर्व्हर डाऊन; मतदार यादीत नाव शोधण्यासाठी गोंधळ, सोशल मीडियावर संताप