सिटीस्कॅन, एमआरआयसाठी भूमिगत कक्षाची चाचपणी; मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश 
मुंबई

सिटीस्कॅन, एमआरआयसाठी भूमिगत कक्षाची चाचपणी; मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील एमआरआय, सिटीस्कॅन आदी चाचण्यांसाठी मोठ्या व अवजड उपकरणाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या चाचण्यांसाठी भूमिगत कक्ष निर्माण करणे शक्य होईल का याचा आढावा घेण्यात यावा, असे आदेश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील एमआरआय, सिटीस्कॅन आदी चाचण्यांसाठी मोठ्या व अवजड उपकरणाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या चाचण्यांसाठी भूमिगत कक्ष निर्माण करणे शक्य होईल का याचा आढावा घेण्यात यावा, असे आदेश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय येथील विविध वैद्यकीय कक्षांच्या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी शुक्रवारी भेट दिली. रुग्णालय पुनर्विकास, विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी, प्राथमिक आरोग्य सुविधांवर येणारा ताण कमी करणे यासारख्या विषयांच्या अनुषंगाने आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

१६ उपनगरीय रुग्णालयांचा ताण कमी करण्यासाठी रुग्ण हस्तांतरित करण्यासाठी लिंकेज सिस्टिम पुनर्जीवित करावी. केईएम रुग्णालयात गुणवत्तापूर्ण व अत्याधुनिक स्वरूपाच्या आरोग्य सुविधांसाठी ‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम’ प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागप्रमुखांनी प्रयत्न करावेत. तसेच प्रणाली अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या माहिती आणि डॅशबोर्डचा नियमितपणे आढावा घ्यावा. रुग्णांसाठी आरोग्य सुविधा सहज आणि तंत्रज्ञानस्नेही स्वरूपात उपलब्ध होतील याची खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देशही आयुक्त भिडे यांनी दिले.

रुग्णालय क्षमतावाढीच्या हाती घेतलेल्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रुग्णांच्या सुविधेच्या अनुषंगाने विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील, यादृष्टाने सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. विविध विभागांचे शस्त्रक्रिया कक्ष संकुल, रक्तचाचणी प्रयोगशाळा या एकाच ठिकाणी असल्याने रुग्णांची वेळेची बचत होईल. एमआरआय, सीटी स्कॅन यासारख्या चाचण्यांसाठी मोठ्या आणि अवजड उपकरणांच्या वापरासाठी भूमिगत कक्ष निर्माण करता येतील का, याचाही आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शस्त्रक्रिया विभागाच्या ठिकाणी अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा ‘कॉर्पोरेट सामाजिक दायित्व’ महापालिकेच्या माध्यमातून तसेच (सी.एस.आर.) अंतर्गत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या. तसेच रुग्णालय पुनर्विकासअंतर्गत उपलब्ध जागेचा अधिकाधिक वापर करत रुग्णांना आणि आरोग्य यंत्रणेला होईल, यादृष्टीने आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा रुग्णांना कमी कालावधीत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ‘एच.एम. आय. एस.’ सेवेशी उत्तमरीत्या संलग्न करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी बैठकीदरम्यान दिल्या.

जवळच्या दवाखान्यात वैद्यकीय सुविधा द्या !

केईएम रुग्णालयावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी येणारा ताण पाहता वैद्यकीय सुविधा नजीकच्या दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात याव्यात. केईएम रुग्णालयाने नजीकच्या दवाखान्यांच्या ठिकाणी आरोग्य सुविधांसाठीचे रुग्ण पाठवावेत, त्यामुळे प्राथमिक सेवेवर येणारा ताण कमी होईल, अशा सूचना अश्विनी भिडे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.

Mumbai : खोटी विधाने करून कोर्टाची दिशाभूल करणे महागात पडले; हायकोर्टाने याचिकाकर्त्याला ठोठावला १ लाखाचा दंड

Mumbai : मे अखेरपर्यंत कोस्टल रोडवर दोन फ्लड गेट्स बसवणार; इंदूर येथे चाचणी झाली पूर्ण

Mumbai : ५० लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या 'डीआरआय'च्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा

मुंबईत एक आठवडा ५ टक्के पाणीकपात; जलबोगद्यांचे क्लोरीनीकरण करणार

एसटी बस स्थानकांवरील शौचालये १ जूनपासून मोफत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा