

नवी दिल्ली : अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) डाबरच्या मध, तूप आणि खोबरेल तेलासह काही उत्पादनांवर कारवाई करत त्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या उत्पादनांच्या पॅकेजिंग आणि जाहिरातींमधून ग्राहकांची दिशाभूल करणारे दावे केल्याचा आरोप करत ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच, संबंधित उत्पादनांतील दाव्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
FSSAI ने सोमवारी (दि. ३) एक्सवर याबाबत माहिती दिली. डाबरच्या अधिकृत संकेतस्थळावर मध, ॲपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, गायीचे तूप, नारळपाणी आणि नारळाचे दूध यांसारख्या उत्पादनांवर शुद्धता आणि नैसर्गिकतेचे दावे करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
नियामकाच्या मते, हे दावे पडताळणी न करता येणारे आणि ग्राहकांची दिशाभूल करणारे आहेत.
'जैविक भारत' लोगोवरही आक्षेप
FSSAI ने डाबरच्या काही उत्पादनांवर 'जैविक भारत' (Jaivik Bharat) लोगोचा वापरही नियमबाह्य असल्याचे म्हटले आहे. डाबर हिमालयन ऑरगॅनिक ॲपल सायडर व्हिनेगर आणि डाबर ऑरगॅनिक हनी या उत्पादनांवर वैध सेंद्रिय मान्यता नसताना हा लोगो वापरण्यात आल्याचे आढळले.
तसेच, डाबर होममेड कोकोनट मिल्क या उत्पादनावरही शुद्धतेबाबत दिशाभूल करणारा दावा करण्यात आला आहे.
नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका
FSSAI ने स्पष्ट केले की, हे दावे एफएसएस (Advertising and Claims) Regulations, 2018 चे उल्लंघन करतात. अशा प्रकारची माहिती ग्राहकांमध्ये चुकीचा समज निर्माण करू शकते.
विशेषतः मिश्रित अन्नपदार्थांसाठी अशा प्रकारे शुद्धतेची हमी देणारे दावे करण्यास नियमांनुसार परवानगी नाही.
१५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
FSSAI ने सांगितले की, यापूर्वीही डाबरला अशा जाहिराती आणि दावे मागे घेण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. मात्र, कंपनीकडून समाधानकारक सुधारणा करण्यात आली नाही.
त्यामुळे संबंधित सर्व उत्पादने आणि अशा प्रकारचे दिशाभूल करणारे दावे तातडीने हटवून १५ दिवसांच्या आत कृती अहवाल (Action Taken Report) सादर करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.
इतर कंपन्यांवरही FSSAI ची नजर
गेल्या काही महिन्यांपासून FSSAI विविध अन्न उत्पादक कंपन्या आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्री होणाऱ्या उत्पादनांवर कारवाई करत आहे. अलीकडेच अनेक मद्य उत्पादक आणि ऊर्जा पेय तयार करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिरातींची चौकशी सुरू करण्यात आली आहे.