मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील फिनिक्स मार्केटसिटी मॉलच्या मागे असलेल्या प्रमोद महाजन उद्यानात तरुण आणि तरुणीला अल्पवयीन मुलांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेची मुंबई महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. उद्यानाच्या देखभालीसह सुरक्षेची जबाबदारी असतानाही कंत्राटदाराकडून योग्य खबरदारी घेण्यात आली नसल्याचे आढळल्याने महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे तसेच एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या कारवाईमुळे उद्यानांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्रमोद महाजन उद्यान हे मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असून, त्याची देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षेची जबाबदारी कंत्राटदाराकडे सोपवण्यात आली आहे. या उद्यानासाठी केअर टेकरची नियुक्तीही करण्यात आली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी उद्यानात एका तरुण आणि तरुणीला अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने बेल्ट, काठ्या आणि हातांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या अल्पवयीन मुलांविरोधात कारवाई केली असली, तरी महापालिकेच्या उद्यानातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.