पार्किंग ॲप प्रकल्प कागदावरच; हार्डवेअरमधील गुंतवणूक कंत्राटदारांना न परवडणारी; BMC दीड महिन्यात पुन्हा निविदा काढणार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

पार्किंग ॲप प्रकल्प कागदावरच; हार्डवेअरमधील गुंतवणूक कंत्राटदारांना न परवडणारी; BMC दीड महिन्यात पुन्हा निविदा काढणार

मुंबईतील वाहनतळांची उपलब्धता व वाहनांची वाढती संख्या यांच्यातील दरी कमी करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या स्मार्ट मोबाईल पार्किंग ॲपचा प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून कागदावरच आहे. वारंवार निविदा काढूनही कंत्राटदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रकल्पाची अंमलबजावणी रखडली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील वाहनतळांची उपलब्धता व वाहनांची वाढती संख्या यांच्यातील दरी कमी करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या स्मार्ट मोबाईल पार्किंग ॲपचा प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून कागदावरच आहे. वारंवार निविदा काढूनही कंत्राटदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रकल्पाची अंमलबजावणी रखडली आहे. हार्डवेअर उभारणीसाठी करावी लागणारी मोठी गुंतवणूक आणि त्या तुलनेत मिळणारा परतावा यामुळे निविदाकारांनी या कामाकडे पाठ फिरवली आहे. आता हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या कामांच्या अटी-शर्तींमध्ये बदल करून महापालिका नव्याने निविदा मागवणार आहे. येत्या एक ते दीड महिन्यात ही निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबईत वाहनांची संख्या ४८ लाखांहून अधिक झाली असून, त्यात सुमारे २९ लाख दुचाकी आहेत. वाढत्या वाहनसंख्येमुळे रस्त्यांवरील वाहतूककोंडीबरोबरच पार्किंगचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मेट्रोसह विविध विकासकामांमुळे रस्त्यांवरील वाहनतळांच्या जागाही कमी होत आहेत. अशा परिस्थितीत उपलब्ध वाहनतळांची माहिती एका क्लिकवर मिळावी, या उद्देशाने महापालिकेने स्मार्ट मोबाईल पार्किंग ॲपची संकल्पना पुढे आणली होती.

पार्किंगची डिजिटल यंत्रणा उपलब्ध नाही

सध्या मुंबईतील २६ विभागांपैकी काही विभागांमध्ये शुल्क आकारून पार्किंगची सुविधा दिली जाते. शहरात ९८ रस्त्यांवर पार्किंगची व्यवस्था असून, ३५ सार्वजनिक पार्किंग लॉट उपलब्ध आहेत. याशिवाय बहुमजली यांत्रिकी वाहनतळ उभारण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. मात्र, उपलब्ध पार्किंगची माहिती वाहनचालकांपर्यंत पोहोचवणारी डिजिटल यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही.

दोनदा निविदा काढल्या

या ॲपसाठी जानेवारी २०२४ नंतर हार्डवेअरच्या कामासाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र, कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्याने दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही यश आले नाही. सॉफ्टवेअरच्या कामासाठी काढलेल्या निविदांनाही अल्प प्रतिसाद मिळाला. त्यानंतर कंत्राटदारांचा सहभाग वाढावा यासाठी अटी-शर्तींमध्ये बदल करून मार्च २०२५ मध्ये ऑन-स्ट्रीट आणि ऑफ-स्ट्रीट पार्किंगसाठी पुन्हा निविदा काढण्यात आली.

निविदा रद्द करण्याची वेळ

या प्रकल्पात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा पुरवठा, स्थापना, चाचणी, कार्यान्वयन आणि देखभाल या कामांचा समावेश होता. २०२५ च्या पावसाळ्यानंतर ही सुविधा सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन होते. मात्र, वारंवार मुदतवाढ देऊनही निविदेला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही.

ॲपवर मिळणार उपलब्ध पार्किंगची माहिती

स्मार्ट मोबाईल पार्किंग ॲप सुरू झाल्यानंतर वाहनचालकांना जवळपास उपलब्ध असलेल्या पार्किंगची माहिती मोबाईलवर मिळणार आहे. सरकारी व खासगी कार्यालयांच्या जागा, निवासी सोसायट्यांमधील उपलब्ध पार्किंग तसेच रस्त्यांवरील वाहनतळांची माहिती या ॲपवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. पार्किंगची उपलब्धता आणि शुल्क याची माहिती मिळाल्याने वाहनचालकांना वाहन उभे करण्यासाठी जागा शोधण्यात लागणारा वेळ वाचणार आहे. तसेच, या सुविधेच्या माध्यमातून महापालिकेला महसूल मिळण्याचीही अपेक्षा आहे. मात्र, तीन वर्षांनंतरही निविदेच्या फेऱ्यात अडकलेल्या या प्रकल्पामुळे स्मार्ट पार्किंगचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यास आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मदर डेअरी, अमूलपाठोपाठ आता गोकुळचे दूधही महागणार? दरवाढीच्या हालचाली सुरू

विलीनीकरणाची माझ्यासमोरच चर्चा; राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट

राईडपूर्वीच 'टिप' मागणे OLA ला पडले महागात

मोदी माझा फोन टॅप करतात...; राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप

नियोजित आंदोलनापूर्वी वांगचुक यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; घराबाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त