मुंबई : मुंबईतील रस्त्यांवरील उघडी, तुटलेली किंवा गायब झालेली मॅनहोलची झाकणे पावसाळ्यात जीवघेणी ठरु नयेत, यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ए ते जी/उत्तर विभागातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या मॅनहोलवरील तुटलेली व गहाळ झालेली झाकणे बदलून त्यांच्या जागी नवीन आयताकृती लोखंडी (एमएस) झाकणे बसविण्यात येणार आहेत. एका झाकणासाठी २५ हजार ७६९ रुपये खर्च करण्यात येणार असून एकूण १ कोटी १० लाख ४९ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या मुंबई मलनिस्सारण व पर्जन्य जलवाहिनी
विभागाचे असे एकूण १ लाख ३ हजार ९२६ मॅनहोल आहेत. मात्र मुंबई शहरातील अनेक ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यांच्या मॅनहोलवर कास्ट आयर्न (सीआय) किंवा डक्टाइल आयर्न (डीआय) प्रकारची झाकणे बसविण्यात आली आहेत. मात्र, काही ठिकाणी झाकणे तुटलेली किंवा गायब झाली आहेत. विशेष म्हणजे, या झाकणांच्या फ्रेम सुस्थितीत असल्या तरी त्यांचे आकार प्रमाणित नसल्याने बाजारात उपलब्ध असलेली तयार झाकणे बसविणे शक्य होत नाही. त्यामुळे जागेवरच मोजमाप घेऊन एमएसची झाकणे तयार करून विद्यमान फ्रेमवर चेन लॉकिंग यंत्रणेसह बसविण्यात येणार आहेत.
स्थायी समितीपुढे मांडणार प्रस्ताव
जीएसटी आणि चार टक्के भौतिक सादिलवारासह या कंत्राटाची एकूण किंमत १ कोटी १० लाख ४९ हजार ७१ रुपये आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक मॅनहोलची झाकणे बदलणे आवश्यक असल्याने प्रशासनाने यापूर्वीच ५० लाख रुपयांपर्यंतच्या कामाला मंजुरी दिली आहे. आता उर्वरित कंत्राटाला मंजुरी मिळावी, यासाठी गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
निविदेला दोन वेळा मुदतवाढ
या कामासाठी ४०० चौरस मीटर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून कंत्राटाचा कालावधी २४ महिने किंवा कामाची निर्धारित मात्रा पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. विशेष म्हणजे या कामासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही निविदेला केवळ दोन कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. त्यामध्ये बेलटेक इंजिनिअर्स यांनी ९० लाख ३ हजार ४८० रुपयांचा (जीएसटी वगळून) सर्वात कमी दर दिला. हा दर पालिकेच्या अंदाजित किमतीपेक्षा १२.६५ टक्के कमी आहे.