Mumbai : पिसे-पांजरापूर होणार धोकादायक झाडांपासून मुक्त; मृत, धोकादायक झाडे हटवण्यासाठी १ कोटी ७ लाखांचा खर्च 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : पिसे-पांजरापूर होणार धोकादायक झाडांपासून मुक्त; मृत, धोकादायक झाडे हटवण्यासाठी १ कोटी ७ लाखांचा खर्च

मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे-पांजरापूर जलसंकुल परिसरातील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि मृत वृक्ष हटवण्यासाठी मुंबई महापालिका तब्बल १ कोटी ७ लाख ४२ हजार रुपये खर्च करणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे-पांजरापूर जलसंकुल परिसरातील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि मृत वृक्ष हटवण्यासाठी मुंबई महापालिका तब्बल १ कोटी ७ लाख ४२ हजार रुपये खर्च करणार आहे. या कामासाठी मे. डी. एस. इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून त्यांना ९३ लाख ९० हजार रुपयांचा कंत्राट देण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

पिसे-पांजरापूर जलसंकुल परिसरात प्रशासकीय इमारत, उदंचन केंद्र, जलशुद्धीकरण संयंत्र, विद्युत उपकेंद्र, गाळणी संयंत्र, स्थिरावणी टाक्या आदी महत्त्वाच्या सुविधा आहेत. तसेच येवई येथे महासंतुलक जलाशय आणि आग्रा रोड येथे महापालिका कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. या संकुलातून मुंबई आणि उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो. परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे.

वर्षभरासाठी कंत्राटदारांची नियुक्ती

या कामासाठी महापालिकेकडे प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच उंच झाडांवर चढण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि वृक्षतोडीच्या यंत्रसामग्रीची उपलब्धता नाही. त्यामुळे पुढील १२ महिन्यांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मागवण्यात आलेल्या निविदांना पाच कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी डी.एस. इन्फ्रास्ट्रक्चर यांनी कार्यालयीन अंदाजापेक्षा ३२.४० टक्के कमी दराने निविदा सादर केली. त्यांचा दर रास्त आणि काम करण्यायोग्य असल्याचे प्रशासनाच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

असे आहे कंत्राट

या कामासाठी कार्यालयीन अंदाज १ कोटी ३८ लाख ९० हजार रुपये होता. मात्र, सर्वात कमी दर देणाऱ्या डी.एस. इन्फ्रास्ट्रक्चर यांची ९३ लाख ९० हजार २४६ रुपयांची निविदा स्वीकारण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यात चार टक्के भौतिक सादिलवार शुल्काची भर घातल्यानंतर कंत्राटाची रक्कम ९७ लाख ६५ हजार ८५६ रुपये होणार आहे तर १० टक्के पर्यवेक्षण शुल्कासह खर्च १ कोटी ७ लाख ४२ हजार ४५० इतका आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तिकीट दरांमध्ये हस्तक्षेप करण्याचे सरकारला अधिकार; प्रवासी भाड्याबाबत नवे नियम जाहीर

Mumbai : शिक्षक मारहाण प्रकरण; अखेर १० वर्षांनी महापौर रितू तावडे न्यायालयात हजर

Gold Rate Hike : दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत वाढ; चांदी स्थिर

Mumbai : ११०० कोटींच्या थकबाकीमुळे महालॅब, डायलिसिस केंद्रांना टाळे

दिवाळीत पाणी कपात स्थगित; ठाणेकरांना किंचित दिलासा; स्टेमपाठोपाठ MIDC चा निर्णय