मुंबई : रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर २०१६ मध्ये महाविद्यालयाच्या सहलीत १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. दुर्घटनेप्रकरणी पुण्यातील आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाशी संबंधित विश्वस्त, प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा न्यायालयाने रद्द केला आहे.
न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. १ फेब्रुवारी २०१६ रोजी महाविद्यालयाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर सहल नेली होती. यासाठी ११६ विद्यार्थी आणि कर्मचारी गेले होते. तृतीय वर्षातील ४१ विद्यार्थी समुद्राच्या प्रवाहात वाहून गेले. मात्र १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुरुड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४-अ आणि ३४ अंतर्गत १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधितांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले होते.
त्यावर न्या. मिलिंद जाधव यांनी सुनावणी घेऊन निकाल दिला. या प्रकरणात गुन्हेगारी निष्काळजीपणा सिद्ध करण्यासाठी आरोपींच्या कृतीचा आणि विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा थेट किंवा निकटचा संबंध असणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
एकाच महाविद्यालयाशी संबंधित असल्यामुळे किंवा सहलीत सहभागी झाल्यामुळे सर्व शिक्षक आणि विश्वस्तांना फौजदारी जबाबदार धरता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मृत विद्यार्थी १८ वर्षांवरील प्रौढ होते आणि समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या दुर्घटनेत त्यांच्या मृत्यूचा आरोपींच्या निष्काळजीपणाशी थेट संबंध दर्शवणारा पुरावा उपलब्ध नसल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले.