मुंबई : मुंबईतील कामा आणि आल्ब्लेस रुग्णालयात १ एप्रिलपासून स्वतंत्र आनुवंशिक समुपदेशन विभाग सुरू करणार असल्याची घोषणा वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी केली आहे.
हा नवीन विभाग प्रामुख्याने आनुवंशिक आजारांचे निदान, समुपदेशन आणि व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करेल, ज्याद्वारे रुग्णांना प्रगत आणि वैयक्तिकृत उपचार मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. या विभागाचे नेतृत्व अनुवांशिक तज्ज्ञ डॉ. शबाना बोराटे आणि डॉ. क्षमता किंद्रे करणार असून, त्या क्लिनिकल सेवा आणि रुग्णसेवेची जबाबदारी सांभाळतील.
या विभागाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जेनेटिक काऊन्सिलिंग- ही एक अत्यंत आवश्यक सेवा आहे जी व्यक्ती आणि कुटुंबांना अनुवांशिक आजार समजून घेण्यास, भविष्यातील पिढ्यांमध्ये हे आजार जाण्याचा धोका ओळखण्यास आणि वैद्यकीय तसेच पुनरुत्पादनाशी संबंधित माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते. ही सेवा बाधित कुटुंबांना भावनिक आणि मानसिक आधार देईल.
हे केंद्र डाऊन सिंड्रोम, यॅलेसेमिया, सिकलसेल अॅनिमिया आणि टर्नर सिंड्रोम यांसारख्या विविध आनुवंशिक आजारांसह इतर जन्मजात आणि क्रोमोसोमल विकृतींच्या निदानासाठी आणि व्यवस्थापनासाठी मदत करेल.
जागतिक स्तरावर, नवजात बालकांमधील अनुवांशिक आणि जन्मजात विकार ही एक मोठी आरोग्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरातील सुमारे ६% बालके-म्हणजेच दरवर्षी साधारण ७९ लाख मुले- आनुवंशिक किंवा अंशतः आनुवंशिक विकारासह जन्माला येतात. यामध्ये डाऊन सिंड्रोमसारख्या गुणसूत्रांमधील दोषांपासून ते थैलेसेमिया आणि सिकलसेल अॅनिमियासारख्या रक्ताच्या अनुवांशिक आजारांचा समावेश होतो.
हा नवीन विभाग गर्भधारणेदरम्यान विकृती शोधण्यासाठी प्रसवपूर्व तपासणी आणि नवजात बालकांमधील अनुवांशिक आजारांचे लवकर निदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, या उपक्रमामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा बळकट होईल.
६४ बालके जन्मजात दोषग्रस्त
भारतातही हे प्रमाण तितकेच गंभीर आहे. अभ्यासानुसार, दर १,००० जिवंत जन्मांमागे अंदाजे ६४ बालके जन्मजात दोषांनी ग्रस्त असतात, ज्यांपैकी अनेकांचा आधार आनुवंशिक असतो. काही क्षेत्रांमध्ये स्क्रीनिंगच्या मर्यादित सुविधांमुळे लवकर निदान आणि समुपदेशनाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते.