मुंबई : मुंबई सेंट्रल येथील गिल्डर लेन परिसरातील हिरा मंजिल इमारतीला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य राबवत आठ जणांची सुखरूप सुटका केली. या घटनेत अग्निशमन दलाचे एक अधिकारी जखमी झाले. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबई सेंट्रल येथील गिल्डर लेन रिलायन्स सुपर मार्केटजवळ, नवजीवन सोसायटीच्या शेजारी हिरा मंजिल या तळ अधिक तीन मजली इमारतीत रविवारी रात्री दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने लेव्हल-१ आणि त्यानंतर रात्री १२ वाजून ५० मिनिटांनी लेव्हल-२ आग घोषित करण्यात आली. दुसऱ्या मजल्यावरील खोलीत आग लागली असताना तिसऱ्या मजल्यावर आणि गच्चीवर नागरिक अडकले होते.
टर्नटेबल शिडीच्या मदतीने महिलांची सुटका
अग्निशमन दलाने टर्नटेबल शिडीच्या मदतीने तिसऱ्या मजल्यावरून एक पुरुष आणि दोन महिलांची सुटका केली. पहिल्या मजल्यावर अडकलेल्या एका वृद्ध महिलेला जिन्याद्वारे बाहेर काढण्यात आले. तसेच चौथ्या मजल्यावरील खोलीत अडकलेला एक पुरुष, एक महिला, एक मुलगा आणि एका मुलीचीही जिन्याच्या मार्गे सुटका करण्यात आली. अशा एकूण आठ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
आगीमध्ये विद्युत वायरिंग, विद्युत उपकरणे, लाकडी फर्निचर, कपाट, पलंग, दरवाजे, खिडक्या, एसी, टीव्ही, कागदपत्रे आणि घरगुती साहित्य जळून खाक झाले. पहिल्या मजल्यावरुन बाहेर काढलेल्या वृद्ध महिलेला घबराट झाल्याने पोलिसांच्या वाहनातून रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचारानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचा अग्निशमन दलाचे अधिकारी स्थानिक पालिकेचे अधिकारी व स्थानिक पोलीस पुढील तपास करीत आहेत.
अग्निशमन दलाचे अधिकारी जखमी
अग्निशमन दलाने पहाटे ५ वाजून ५ मिनिटांनी आग पूर्णपणे विझवली. या बचावकार्यादरम्यान मेमनवाडा अग्निशमन केंद्राचे वरिष्ठ अधिकारी भोई यांच्या उजव्या हाताच्या तळव्याला दुखापत झाली. त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु टाके घालून उपचार केल्यानंतर त्यांनाही घरी सोडण्यात आले.