मुंबई : ‘नीट’ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता मध्य रेल्वेने रविवारचा (दि. ३) मेगाब्लॉक रद्द केला आहे. मात्र, शनिवारी मध्यरात्री मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकपूर्वी डाऊन मार्गावरील शेवटची उपनगरी ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते टिटवाळा ही रात्री ११.१६ वाजता सुटेल, तर अप मार्गावर टिटवाळा ते सीएसएमटी ही गाडी कल्याण येथून रात्री १०.२२ वाजता सुटेल.
सीएसएमटी आणि विद्याविहारदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गांवर रात्री १२.०५ ते पहाटे ५.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११.३० ते पहाटे ०४.४७ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहारपर्यंत डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. पुढे विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.
पश्चिम रेल्वेवर नाइट ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकांदरम्यान मेट्रो मार्ग-६ चा स्टील गर्डर्सच्या उभारणीसाठी शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री ९ वाजल्यापासून सकाळी ७.३० वाजेपर्यंत घेण्यात येईल. यासह अप फास्ट आणि पाचव्या मार्गावर मध्यरात्री १ वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाईल.
ट्रान्स हार्बर मार्गावरही ब्लॉक
ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरूळ दरम्यान अप व डाऊन मार्गांवर रात्री ११.४५ ते पहाटे ०४.४५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत ठाणे आणि वाशी/नेरूळ दरम्यान अप व डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.