मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मध्य रेल्वेने मुंबई विभागात रविवार, १ नोव्हेंबरला मेगाब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉकचा फटका प्रामुख्याने मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील प्रवाशांना बसणार आहे, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यानदेखील ब्लॉक घेण्यात आला आहे.
मुख्य मार्गावरील ब्लॉक आणि वेळेचे नियोजन
वेळ: सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत (सीएसएमटी ते विद्याविहार, अप आणि डाऊन धीमा मार्ग).
डाऊन मार्गावरील गाड्या
सीएसएमटीहून सकाळी डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि त्यानंतर विद्याविहार येथे पुन्हा धीम्या मार्गावर आणल्या जातील.
अप मार्गावरील गाड्या
घाटकोपरहून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान जलद मार्गावर चालवल्या जातील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
प्रवाशांनी नियोजन करावे
हार्बर मार्गावरील सीएसएमटी-गोरेगाव आणि सीएसएमटी-पनवेल सेवा तसेच पोर्ट मार्गावरील नेरुळ/बेलापूर-उरण सेवा नेहमीप्रमाणे रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत. प्रवाशांनी ब्लॉकचे वेळापत्रक लक्षात घेऊनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.