मुंबई

मुंबई शहराला पाणीटंचाईचे चटके सोसावे लागणार?

पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे

प्रतिनिधी

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १४.६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच तलावात सरासरी २ लाख १२ हजार दशलक्ष लिटर्स पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आता जूनच्या मध्यापर्यंत पाऊसाचे आगमन लांबल्यास जुलैच्या मध्यपर्यंतचा पाणी साठा धरणात असूनही मुंबईकरांना पाण्याची अडचण निर्माण होऊ नये यासाठी पाणी कपात करावी लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते असा अंदाज पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.

राज्यातील शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके नागरिकांना सोसावे लागत असले तरी, मुंबईकर पाण्याच्या बाबतीत सुखी आहेत. सध्या मागील वर्षाच्या जूनच्या तुलनेत पाणीसाठा काही अंशी जास्त आहे. यंदा मान्सूनचे आगमन लवकर असल्याची शक्यता मुंबई हवामान विभाग वर्तवत असला तरी अजूनही पावसाळी वातावरण निर्मिती झालेली नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सातही तलावांमध्ये जुलै मध्यापर्यंत पाणी पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असला तरी जूनच्या मध्या पर्यंत पावसाने हजेरी न लावल्यास पाणी कपातीची वेळ येऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र अजून पाणी कपातीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याने मुंबईकराना घाबरून जाण्याची गरज नाही. तरी मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेकडून केले जात आहे.

शहराला दररोज १८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावात १ लाख ४२हजार २१० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. मध्य वैतरणा तलावातही सुमारे ४४ हजार ७९० दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मोडक सागर ४६ हजार ६३९ तर तानसा १० हजार ८५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक असल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून सांगण्यात आले. मुंबई शहराला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे महिना सरासरी १ लाख १५ हजार ते १ लाख १९ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासते. तलावातील पाण्याचा साठा लक्षात घेता, हे पाणी जुलै मध्यापर्यंत पुरेल इतके आहे. हवामान खात्याने यंदा १ जून पर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र अजूनही पावसाळी वातावरण निर्माण झालेले नाही. त्यामुळे शहरात सध्या तरी पाणीकपातीचा निर्णय झालेला नसला तरी जूनच्या पंढरवड्यापर्यंत पाऊस न आल्यास पाणी कपातीबाबत निर्णय घ्यावा लागेल अशी माहिती जल अभियंता विभागातील वरिष्ठ अभियंत्याने दिली.

जनसुरक्षा नव्हे जनदडपशाही

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार