मुंबई : मुंबईतील नागरी संघटना आणि अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संस्थांच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या (ईसीआय) वादग्रस्त 'विशेष सखोल पुनरावृत्ती' (एसआयआर) मोहिमेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे तसेच सध्याच्या निवडणूक आयोगाचे विसर्जन करून त्याच्या सदस्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
'युनायटेड अगेन्स्ट इन्जस्टिस अँड डिस्क्रिमिनेशन' या व्यासपीठाने आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेस 'पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज' आणि 'असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स' या संघटनांचा पाठिंबा होता.
मतदारयाद्यांमधून तब्बल १३ कोटी (१३० दशलक्ष) नावांचे वगळण्यात आल्यामुळे ही मोहीम डेटा शुद्ध करण्यासाठी आहे की अल्पसंख्याक आणि उपेक्षित घटकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी, असा सवाल वक्तांनी उपस्थित केला.
दरम्यान, मृत पावलेले, पत्ते बदललेले किंवा दुबार नावे असणारे मतदार वगळण्यात आल्याचे सांगत सरकारने या कपातीचे समर्थन केले आहे.
महाराष्ट्रातील ३१ टक्के मतदार वगळले
ॲड. संध्या गोखले यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेत ३१ टक्के मतदार वगळण्यात आले आहेत आणि मसुदा मतदारयादी जाहीर झाल्यानंतर १८ टक्के मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत यादरम्यान महाराष्ट्राच्या मतदारयादीत ५० लाख नवीन मतदार जोडले गेले, असा आरोप गोखले यांनी केला.
सत्तेत टिकून राहण्यासाठी हे सगळे सुरू आहे; कोणत्या मतदारसंघात नवीन नावे जोडली गेली आणि त्या जागांवर भाजपचे विजयाचे मार्जिन किती होते, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही, असे गोखले म्हणाल्या.
काहींना मतदानापासून दूर ठेवले
सामाजिक कार्यकर्त्या आणि माजी प्राध्यापिका उल्का महाजन यांनी आरोप केला की, एकाही पात्र मतदाराचे नाव सुटणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असताना, सध्याच्या प्रक्रियेची रचनाच काही घटकांना मतदानापासून दूर ठेवण्यासाठी केली गेली आहे. आम्ही बेकायदेशीर स्थलांतरितांना मतदानापासून रोखण्यास विरोध करत नाही. पण एसआयआर प्रक्रिया ही मनमानी स्वरूपाची आहे. लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली स्वतंत्र यंत्रणा म्हणून निवडणूक आयोग कार्य करत असले, तरी सध्याची मतदारयादी पुनरावृत्तीची प्रक्रिया सदोष आहे, असा आरोप महाजन यांनी केला.