Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला... (Photo- Instagram)
मुंबई

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

मुंबईचा रहिवासी आणि एक सामान्य नागरिक म्हणून लोकांच्या हालचालींवर निर्बंध का घातले जात आहेत, तसेच त्यांचा आवाज का दाबला जात आहे, हे जाणून घेण्यासाठी...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही निदर्शने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. ऑगस्ट क्रांती मैदानावरील प्रस्तावित आंदोलनाच्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ताब्यात घेतल्यानंतर इम्रानने पोलिसांच्या व्हॅनमधील स्वतःचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यासोबत त्याने मिश्कील कॅप्शन दिल्याने सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली आहे.

पोलिसांच्या व्हॅनमधून इम्रानची मिश्कील पोस्ट

अभिनेता आमिर खानचा भाचा असलेल्या इम्रान खानने पोलिसांच्या व्हॅनमधील फोटो शेअर करत, "बहुतेक मी फिरायला चाललो आहे" (Apparently I’m going for a drive) असे लिहिले. या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांसह सोशल मीडिया युजर्समध्ये चर्चा सुरू झाली. पोलिस कर्मचारी त्याला वाहनात बसवून घेऊन जात असल्याचे कथित दृश्य असलेला व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला आहे.

'लोकांचा आवाज का दाबला जात आहे?'

एएनआयच्या वृत्तानुसार, प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्रानने आपण कोणतीही विशिष्ट मागणी घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी आलो नसल्याचे सांगितले. मुंबईचा रहिवासी आणि एक सामान्य नागरिक म्हणून लोकांच्या हालचालींवर निर्बंध का घातले जात आहेत, तसेच त्यांचा आवाज का दाबला जात आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण येथे आल्याचे त्याने स्पष्ट केले.

"माझ्या कोणत्याही मागण्या नाहीत. मी या शहरात राहणारा एक नागरिक म्हणून येथे आलो आहे. लोकांच्या मुक्तपणे फिरण्याच्या स्वातंत्र्यावर निर्बंध का घातले जात आहेत आणि त्यांचा आवाज का दाबला जात आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे," असे इम्रान म्हणाला.

आपला कोणत्याही संघटनेशी संबंध नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. आपण स्वतःच्या इच्छेने आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगत, नागरिक म्हणून आपली भूमिका मांडण्यासाठी येथे आल्याचे त्याने नमूद केले.

विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबतही व्यक्त केला होता संताप

विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमाराबाबतही इम्रानने यापूर्वी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्याने केला होता.

"पोलिस विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अश्रुधुराचा मारा करत होते आणि त्यांना मारहाण करत होते. या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली, पण व्यवस्थेनेच त्यांची निराशा केली. त्यांना केवळ आपले म्हणणे ऐकून घ्यावे, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही," अशा शब्दांत त्याने आपली भूमिका मांडली होती.

विद्यार्थ्यांवर कारवाई करणाऱ्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत, "ही भारतमातेची मुले नाहीत का? जर ही तिची मुले नसतील, तर आपण कोणासाठी विकास करतो आणि कोणाचे भविष्य सुरक्षित करण्याचा दावा करतो?" असा सवालही त्याने केला होता. शैक्षणिक सुधारणांसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत प्रशासनाने संवेदनशील भूमिका घ्यायला हवी, असे मतही त्याने व्यक्त केले होते.

मुंबई आणि दिल्लीत आंदोलकांवर कारवाई

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) विरोधात सीजेपीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन पुकारले असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही निदर्शने करण्यात आली.

माध्यमांच्या वृत्तानुसार, मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात ४०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. तर दिल्लीत सुमारे १,००० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. जंतर-मंतरच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांवर ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, इम्रान खानला ताब्यात घेतल्याच्या वृत्तानंतर त्याच्या समर्थकांनी त्याच्या सुटकेची मागणी करत स्थानिक पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केल्याचेही सांगितले जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता

CJP Protest : अभिजीत दिपकेंसह सीजेपीच्या कार्यकर्त्यांना विमानातच घेतले ताब्यात; आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई