Mumbai CNG Price Hike: आता सीएनजीही महाग; किलोमागे १.५० वाढ, नवा दर ९१.५० रुपये 
मुंबई

Mumbai CNG Price Hike: आता सीएनजीही महाग; किलोमागे १.५० वाढ, नवा दर ९१.५० रुपये

दूध, भाजीपाल्यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता महागाईच्या आगीत सीएनजी दरवाढीने तेल ओतले आहे. महानगर गॅस लिमिटेडने शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबई आणि लगतच्या परिसरात सीएनजीच्या दरात प्रति किलो १.५० रुपयांची वाढ केली आहे.

Swapnil S

मुंबई : दूध, भाजीपाल्यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता महागाईच्या आगीत सीएनजी दरवाढीने तेल ओतले आहे. महानगर गॅस लिमिटेडने शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबई आणि लगतच्या परिसरात सीएनजीच्या दरात प्रति किलो १.५० रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर सीएनजीचा नवा दर प्रति किलो ९१.५० रुपये असणार आहे. या निर्णयाचा थेट फटका रिक्षा, टॅक्सी चालक आणि खासगी सीएनजी वाहनधारकांना बसणार आहे.

महानगर गॅस लिमिटेडने दरवाढीमागील कारणे स्पष्ट करणारे निवेदन जारी केले आहे. सध्या सुरू असलेल्या पश्चिम आशियातील तणाव आणि संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे दर भडकले आहेत. देशांतर्गत गॅस वाटपात कपात झाल्यामुळे महागड्या आयात केलेल्या आरएलएनजी गॅसवरील अवलंबित्व वाढले आहे.

एकूण पुरवठ्यात आयात गॅसचा वाटा वाढल्याने महानगर गॅस लिमिटेडच्या खरेदी खर्चात मोठी वाढ झाली आहे. या खर्चाची अंशतः भरपाई करण्यासाठी आणि ग्राहकांना अखंड पुरवठा सुरू ठेवण्यासाठी ही दरवाढ करणे अपरिहार्य ठरल्याचे कंपनीने म्हटले आहे.

विशेष म्हणजे, मुंबईपूर्वी राज्यातील पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातही सीएनजी आणि घरगुती पाईप गॅसच्या (पीएनजी) किमतीत मध्यरात्रीपासून वाढ करण्यात आली आहे. या शहरांमध्ये सीएनजीचे दर प्रति किलो १.२५ रुपयांनी, तर पीएनजीचे दर प्रति घनमीटर १.५० रुपयांनी वाढले आहेत.

रिक्षाचालकांवर आर्थिक बोजा

सीएनजीच्या दरात अलीकडेच प्रतिकिलो १.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांतील ही दुसरी दरवाढ असून, त्यामुळे रिक्षाचालकांवरील आर्थिक बोजा आणखी वाढला आहे. गेल्या ७५ दिवसांत सीएनजीच्या दरात एकूण ५.५० रुपयांची वाढ झाली आहे. ताज्या दरवाढीमुळे प्रतिकिमी २१ पैशांचा अतिरिक्त खर्च वाढला आहे, असे रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष थंपी कुरियन यांनी सांगितले.

भाडेवाढीचा प्रस्ताव मार्चमध्ये

भाडेवाढीच्या सूत्रानुसार, भाडेवाढीचा विचार करण्यासाठी इतर निर्धारित अटींसह प्रतिकिमी किमान ५० पैशांची वाढ होणे आवश्यक आहे. दोन भाडेवाढींमध्ये किमान सहा महिन्यांचे अंतर असणे बंधनकारक असून, वर्षातून दोन वेळा भाड्याचा आढावा घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे सध्या तातडीने भाडेवाढीची मागणी करता येणार नाही. मार्च किंवा एप्रिलमध्ये भाडेवाढीचा प्रस्ताव सादर करण्याचे आमचे नियोजन आहे. त्यानुसार सुधारित भाडे १ जूनपासून लागू करता येईल," असे कुरियन यांनी सांगितले.

खासगी कॅबचालकांसाठीही किमान भाडेदर निश्चित करा

खासगी कॅबचालकांचे उत्पन्नही घटत असून, त्यांच्या भाड्यातही त्यानुसार वाढ होणे आवश्यक आहे. भाडेदर निश्चित करण्याचा संपूर्ण अधिकार केवळ अॅग्रीगेटर कंपन्यांवर सोपविण्याऐवजी केंद्र आणि राज्य सरकारने वाहनचालकांच्या हिताचे संरक्षण करणारे स्पष्ट धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. राज्य सरकारने अॅग्रीगेटर कंपन्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार केला आहे. मात्र, त्याचे कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी करण्यास विलंब होत आहे. सरकारने ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून कॅबचालकांसाठी न्याय्य किमान भाडेदर निश्चित करावेत," अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या (एमआरआरकेएस) अप-बेस्ड ट्रान्सपोर्ट युनिटचे मुंबई विभागाचे अध्यक्ष मोहम्मद रिझवान शेख यांनी केली.

मुंबई सीएनजी दर :

एप्रिलपासून १०.५० रु./किलो वाढ

१२ एप्रिल - ₹१/किलो

१४ मे - ₹२/किलो

३० मे - ₹२/किलो

१ सप्टेंबर - ₹२/किलो

१ ऑक्टोबर - ₹१/किलो

३१ ऑक्टोबर - ₹१/किलो

१४ नोव्हेंबर - ₹१.५०/किलो

एकूण दरवाढ : ₹ १०.५०/किलो

सध्याचा दर : ३९१.५०/किलो

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

१४ कोटी मतदार अवैध, मग निवडणुका कशा वैध? राहुल गांधी यांचा सवाल

नवा शैक्षणिक वादंग; खासगी विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालये शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कक्षेत? विरोधकांचा आक्षेप, सत्ताधारीही अस्वस्थ

IND vs NZ 5th ODI: भारताच्या फलंदाजांचा कस; न्यूझीलंडविरुद्ध आज निर्णायक पाचवा एकदिवसीय सामना

'रामलीला'वरून माजणार रण; दिल्ली पोलिसांचा निर्बंधांचा प्रस्ताव, ५० हजार लोकांची मर्यादा

Ind vs Pak U19 Final: आशियावर भारताचेच वर्चस्व; थरारक लढतीत पाकिस्तानवर १ गडी राखून सरशी, मोहित ठरला नायक