Mumbai : "जे कमावतो ते सगळं CNG मध्येच जातं!" दरवाढीनंतर टॅक्सी चालकांचा संताप; पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा 
मुंबई

Mumbai : "जे कमावतो ते सगळं CNG मध्येच जातं!" दरवाढीनंतर टॅक्सी चालकांचा संताप; पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

CNG च्या दरात पुन्हा २ रुपयांची वाढ झाल्यानंतर मुंबईतील CNG पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाढत्या इंधन खर्चामुळे टॅक्सी आणि कॅब चालकांनी संताप व्यक्त करत भाडेवाढीची मागणी पुन्हा जोर धरू शकते, असे संकेत दिले आहेत.

Mayuri Gawade

मुंबई : CNG च्या दरात पुन्हा वाढ झाल्यानंतर मुंबईतील टॅक्सी, कॅब आणि CNG टेम्पो चालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) CNG चा दर प्रतिकिलो २ रुपयांनी वाढवून ८६ रुपये केला असून या दरवाढीमुळे वाहनचालकांच्या खर्चात आणखी भर पडली आहे.

दरवाढीनंतर शनिवारी शहरातील अनेक CNG पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. भायखळ्यातील जे.जे. मार्ग परिसरासह विविध भागांतील पंपांवर टॅक्सी, अॅप-आधारित कॅब आणि CNG टेम्पोचालकांनी इंधन भरण्यासाठी गर्दी केली.

"आम्ही जगायचं कसं?" चालकांचा सवाल

सलग होत असलेल्या दरवाढीमुळे कमाईवर मोठा परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया अनेक चालकांनी व्यक्त केली. "इंधनाचे दर असेच वाढत राहिले तर आम्ही ओला-उबर चालकांनी जगायचं कसं? घर चालवायचं आहे. भाडे वाढत नाही, पण CNG चे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे," असे एका टॅक्सी चालकाने सांगितले.

दुसऱ्या एका चालकानेही नाराजी व्यक्त करत म्हटले, "आम्ही जे काही कमावतो ते सगळं CNG मध्येच जातं. भारतात CNG स्वस्त असायला हवी. आता ती इतकी महाग झाली आहे की आमच्यासारख्या लोकांसाठी उदरनिर्वाह करणे कठीण होत चालले आहे."

PNG च्या दरातही वाढ

MGL ने २९ आणि ३० मेच्या मध्यरात्रीपासून घरगुती पाइपद्वारे पुरवठा होणाऱ्या PNG च्या दरातही प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर (SCM) ५० पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे घरगुती PNG चा दर आता ५२ रुपये प्रति SCM झाला आहे.

दरवाढीमागे ही कारणे

कंपनीच्या मते, नैसर्गिक वायू खरेदीचा वाढलेला खर्च, देशांतर्गत गॅस पुरवठ्यातील घट, महागड्या पर्यायी गॅस स्रोतांवर वाढलेले अवलंबित्व आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे ही दरवाढ करावी लागली आहे.

विशेष म्हणजे, गेल्या दोन आठवड्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी १३ मे रोजीही CNG च्या दरात प्रतिकिलो २ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

भाडेवाढीची मागणी पुन्हा जोर धरू शकते

सलग होत असलेल्या दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीची मागणी पुन्हा पुढे येण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या दरवाढीनंतर विविध वाहतूक संघटनांनी प्रवासी भाड्यात प्रतिकिलोमीटर १ रुपयांची वाढ करण्याची मागणी केली होती.

वाहतूक संघटनांच्या मते, वाढते इंधन दर आणि देखभाल खर्चामुळे चालकांचे उत्पन्न सातत्याने घटत आहे. त्यामुळे आर्थिक ताण सहन करणे अधिक कठीण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

CNG अजूनही किफायतशीर असल्याचा MGL चा दावा

दरवाढीनंतरही CNG हे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत किफायतशीर इंधन असल्याचा दावा MGL ने केला आहे. मात्र, पंपांवर उपस्थित असलेल्या अनेक चालकांनी वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे त्यांचा आर्थिक समतोल बिघडत असल्याची खंत व्यक्त केली.

मुंबईत ८२ अतिधोकादायक इमारती; म्हाडाकडून जुन्या इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण

CBSE चा मोठा निर्णय! २०२७ पासून DigiLocker वर मिळणार तपासलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रती, वाचा सविस्तर

भरधाव ट्रकने कारला फरफटत नेले; थोडक्यात वाचला बाप-लेकीचा जीव, अंगावर शहारे आणणारा VIDEO व्हायरल

कोकणचा काजू आता ‘जागतिक ब्रँड’ होणार; ४० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Mumbai : "लक्ष द्या जरा साहेब!" ; बोरिवली स्थानकावरील पादचारी पुलाला तडे? व्हायरल व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये चिंता