मुंबई

Mumbai : कधी सुरू होणार CNG पुरवठा? MGL ने दिली महत्त्वाची माहिती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये सीएनजी (CNG) तुटवड्यामुळे वाहतुकीस मोठा फटका बसला आहे. वडाळा परिसरातील गेल कंपनीच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी (दि. १६) दुपारपासून मुंबईत सीएनजीचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे.

नेहा जाधव - तांबे

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये सीएनजी (CNG) तुटवड्यामुळे वाहतुकीस मोठा फटका बसला आहे. वडाळा परिसरातील गेल कंपनीच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी (दि. १६) दुपारपासून मुंबईत सीएनजीचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. यामुळे रिक्षा, टॅक्सी, खाजगी वाहने आणि काही बसेस यांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.

नेमकं कारण

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी तुटवड्याचे मुख्य कारण राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCF) कंपाऊंडमधील GAIL च्या मुख्य गॅस पाईपलाइनमध्ये झालेला बिघाड आहे. या बिघाडामुळे वडाळा येथील MGL सिटी गेट स्टेशनला जाणारा गॅस पुरवठा प्रभावित झाला आणि त्याचे परिणाम संपूर्ण महानगर प्रदेशात दिसू लागले.

पंपांवर लांबच लांब रांगा

रविवारी दुपारपासूनच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पेट्रोल पंपांवर सीएनजी गॅसचा तुटवडा सुरू झाला. त्यामुळे वाहनचालकांना लांब रांगा लावून गॅस मिळवावा लागला. अनेक रिक्षा आणि टॅक्सी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला, तर कामावर जाणाऱ्यांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मोठा फटका बसला.

सीएनजी पुरवठा कधी पूर्ववत होणार?

गेल कंपनीची वडाळा सिटी टर्मिनलमधील पाईपलाईन अद्याप दुरुस्ती प्रक्रियेत आहे. महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप दुरुस्तीचे काम सुरू आहे. आज संपूर्ण दिवस हे काम सुरू आहे. १८ नोव्हेंबर सकाळपर्यंत सीएनजी पुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.

MGL ने पाईपलाईन दुरुस्ती पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले असून, काही सीएनजी पंपांना इतर सिटी टर्मिनलमधून गॅस पुरवठा केला जात आहे. पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष चेतन मोदी यांनी सांगितले की कमी गॅस प्रेशरमुळे शहरातील अनेक सीएनजी पंप सकाळपासूनच बंद आहेत, परंतु दुरुस्तीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु आहे.

घरगुती पीएनजीवर कुठलाही परिणाम नाही

महानगर गॅस लिमिटेडने घरगुती वापरासाठी पीएनजी गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून, घरगुती ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही, असे स्पष्ट केले.

किती सीएनजी पंप कार्यरत?

MGL ने सांगितले की, एकूण ३८९ सीएनजी स्टेशनपैकी २२५ स्टेशन कार्यरत आहेत. तर बाकीचे स्टेशन बंद असल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रिक्षा, टॅक्सी, ॲप-आधारित कॅब आणि काही BEST या सीएनजीवर चालतात. त्यामुळे शहरातील नागरिकांना प्रवासात मोठा अडथळा येत आहे.

शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याने अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल; म्हणाले, "आम्ही कोणाला घाबरणारे...

"माझे काका....कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून..."; बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

Sheikh Hasina Sentenced To Death : मोठी बातमी! माजी पंतप्रधान शेख हसिना यांना मृत्यूदंडाची शिक्षा

सौदी अरेबियात भीषण अपघात; डिझेल टँकरला बस धडकल्याने ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, हेल्पलाइन क्रमांक जारी

Navle Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात; कंटेनरची ४ ते ५ गाड्यांना धडक