Mumbai : कूपर, ट्रॉमामध्ये पदभरती; डॉक्टरांसह मुबलक मनुष्यबळ उपलब्ध होणार संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : कूपर, ट्रॉमामध्ये पदभरती; डॉक्टरांसह मुबलक मनुष्यबळ उपलब्ध होणार

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या कूपर आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा मनपा केअर रुग्णालयातील डॉक्टर व अन्य रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या कूपर आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा मनपा केअर रुग्णालयातील डॉक्टर व अन्य रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. महिन्याभरात डॉक्टर व अन्य रिक्त पदांमुळे रुग्णालयात निर्माण झालेल्या गैरसोयी दूर करण्यासाठी कूपर आणि ट्रॉमा रुग्णालयात लवकरच ७९० अतिरिक्त पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे. आरोग्य खात्याचे उपायुक्त शरद उघडे यांनी खासदार रवींद्र वायकर यांना बैठकीत आश्वासन दिले. या बैठकीत काही नवीन सेवा सुरू करण्या बरोबरच अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

२७-मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील तसेच कूपर रुग्णालयाशी निगडित प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी खासदार रवींद्र दत्ताराम वायकर यांच्या अध्यक्षतेखाली जोगेश्वरी येथील ट्रॉमा रुग्णालयात मंगळवारी विशेष बैठक पार पडली. या बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त शरद उघडे यांच्यासह पालिकेच्या आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी, रुग्णालयाचे प्रशासन आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीस संचालक डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्षीरसागर यांच्यासह रचना सावंत, राजुल पटेल, विभागप्रमुख ज्ञानेश्वर सावंत, अल्ताफ पेवेकर, राजू पेडणेकर, वैभव भराडकर, प्रियांका आंबोळकर, डॉ. आरिफ, स्वप्नील निरभवणे, राजन राणे, बाळकृष्ण जोशी, निखिल शिंदे, बाबू धामापूरकर, मनीष नायर, मनोज सातारकर, सुचिता टक्के, स्वप्नील सुर्वे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कूपर रुग्णालयात दरदिवशी मोठ्या प्रमाणात रुग्ण व त्यांचे नातेवाईक मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यांतून येत असतात. त्यांच्या सुविधेसाठी कूपर रुग्णालयाजवळ सुविधा शौचालय उभारण्यात यावे अशी सूचना खासदार वायकर यांनी केली. रुग्णालय प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिल्यास खासदार निधीतून शौचालय उभारण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

  •  रुग्णालयांचे सक्षमीकरण!

    २०१३ पासून आरोग्य खात्याने रुग्णालयातील पदभरतीचा आकृतिबंध तयार केला नव्हता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांत डॉक्टरांबरोबरच अनेक पदे रिक्त होती. याचा ताण रुग्णालयाच्या सेवा-सुविधेवर पडत होता. ही अडचण दूर करण्यासाठी आरोग्य खात्याने आकृतिबंध तयार केला असून कूपर आणि ट्रॉमामधील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ७९० अतिरिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत.

  • ५० रुग्णालयांत जेनेरिक मेडिसिन सुविधा!

    रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत दरात जेनेरिक औषधे उपलब्ध करण्यासाठी ट्रॉमा तसेच कूपर रुग्णालयात नागरिकांसाठी लवकरच 'जेनेरिक मेडिसिन' सुविधा सुरू करावी अशी मागणी खासदार वायकर यांनी केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासमवेत पार पडलेल्या बैठकीत केली होती. त्यानुसार मनपाच्या विविध रुग्णालयांत मिळून ५० ठिकाणी जेनेरिक मेडिसिन सुविधा सुरू करण्यात येणार असून यात कूपर रुग्णालयातील याचे काम पूर्ण झाले असून ट्रॉमा रुग्णालयासाठी ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

  • ट्रॉमा रुग्णालयात लवकरच फिजिओथेरपी!

    जोगेश्वरी, अंधेरी, गोरेगाव येथील गोरगरीब रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ट्रॉमा रुग्णालयात फिजिओथेरपी सुविधा नसल्याने ही सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. ही सेवा देखील लवकरच सुरू करण्याचे आश्वासनही प्रशासनातर्फे देण्यात आले.

  • बालशस्त्रक्रिया व एनआयसीयू सुविधा!

    लहान मुलांवर अब कूपर रुग्णालयासोबतच ट्रॉमा रुग्णालयातही शस्त्रक्रिया करण्यात येतील. तसेच ट्रॉमा रुग्णालयात नवजात शिशु तीव्र काळजी विभाग (एनआयसीयू) सुरू करण्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उपायुक्त शरद उघडे यांनी दिली.

  • आयसीयू बेड १०० पर्यंत वाढवण्याच्या सूचना

    सद्यस्थितीत एवढ्या मोठ्या ट्रॉमा रुग्णालयात फक्त १० आयसीयू बेड आहेत. ही संख्या तुटपुंजी असल्याने येथील आयसीयू बेडची संख्या १०० करण्यात यावी, अशी स्पष्ट सूचना खासदार रवींद्र वायकर यांनी अधिकाऱ्यांना दिली. याबाबतही लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

ओशिवरा प्रसूतिगृहाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण

ओशिवरा येथील १५० खाटांचे प्रसूतिगृह प्रगतीपथावर असून डिसेंबर २०२६ पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार असून स्कॉट्स कॉलनी येथील प्रसूतिगृहाच्या आराखड्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच याची निविदा काढण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त उघडे यांनी दिली.

दोषी कंत्राटदार काळ्या यादीत!

मुंबई महानगरपालिकेच्या कूपर आणि ट्रॉमा रुग्णालयातील जी कामे कंत्राटपद्धतीने देण्यात आली आहेत आणि ज्या कंत्राटदार एजन्सींनी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे पैसे जमा केलेले नाहीत, अशा कंत्राटदारांना तात्काळ काळ्या यादीत टाकावे तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना खासदारांनी बैठकीत केली.

११ जणांच्या समितीचा वॉच!

रुग्णालयांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आणि रुग्णांना दर्जात्मक सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी ११ सदस्यांची विशेष समिती गठीत करावी अशी सूचना खासदारांनी रुग्णालय प्रशासनास केली. बचत गटांना रुग्णालयातील कॅन्टीन चालवायला द्यावे, आवश्यक त्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात यावे, रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्णांची माहिती देणारे बोर्ड लावण्यात यावे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा!

कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा ३८ वरून ४३ वर्षे करण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IPO आक्रसणार; एनएसईसाठी भागधारकांनी घेतली माघार; सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम हुकणार

हिंदू-वाणी, हिंदू-वैश्य हे वैश्यवाणीच; नोंदींच्या आधारे जात, वैधता प्रमाणपत्र देणार

पार्थ पवार यांना आरोपी का केले नाही? मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल

Mumbai : गणेशोत्सवात विद्यापीठाचे दीड हजार ‘सारथी’; NSS चे विद्यार्थी पोलिसांच्या मदतीला

Women Asia Cup 2026 : भारतीय महिला संघाचा आज बांगलादेशशी उपांत्य सामना; दुसऱ्या लढतीत पाकिस्तान-श्रीलंका आमनेसामने