Mumbai : नगरसेवकांना हवाय एक कोटीचा निधी; भाजप नगरसेविका आग्रही, शिवसेना, काँग्रेसचे समर्थन  (Photo- https://www.mcgm.gov.in/)
मुंबई

Mumbai : नगरसेवकांना हवाय एक कोटीचा निधी; भाजप नगरसेविका आग्रही, शिवसेना, काँग्रेसचे समर्थन

मुंबई महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांना आता ६० लाखांऐवजी १ कोटींचा निधी हवा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांना आता ६० लाखांऐवजी १ कोटींचा निधी हवा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भाजपच्या नगरसेविका अश्विनी मते यांनी एक कोटींचा निधी करण्याकडे लक्ष वेधले असून याला शिवसेना व काँग्रेसनेही समर्थन दिले आहे.

दरम्यान, महापौर निधी २५० कोटी मिळाला पण विरोधकांना असमान वाटप करण्यात आले. त्यामुळे समान निधी वाटप करण्यात यावा, यावर सत्ताधारी नगरसेवकांनी आवाज उठवला पाहिजे, असा टोला विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी लगावला. प्रभागातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, सार्वजनिक प्रसाधनगृहे, उद्यानांचे सुशोभीकरण तसेच अन्य तातडीची नागरी कामे करण्यासाठी नगरसेवक स्वेच्छानिधीचा वापर केला जातो. मात्र, वाढती महागाई, बांधकाम साहित्याच्या दरात झालेली वाढ आणि मजुरीच्या खर्चात झालेली वाढ यामुळे सध्याचा ६० लाख रुपयांचा निधी अपुरा पडतो. त्यामुळे एक कोटींचा निधी करण्यात यावा, असे मते यांनी ठरावाच्या सूचनेत नमूद केले आहे.

प्रभागातील नागरिकांच्या विविध नागरी समस्या सोडविताना मर्यादित निधीमुळे अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवक स्वेच्छा निधीची वार्षिक मर्यादा ६० लाखांवरून १ कोटी रुपये करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

१२ वर्षांनंतर निधीत होईल वाढ - अशरफ आजमी

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना निधी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते.‌ अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार ४५ लाख रुपये शौचालयाच्या कामासाठी तर १५ लाख रुपये विकासकामासाठी दिला जातो. १२ वर्षांपूर्वी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. आता मात्र प्रत्येक गोष्टींत खर्चात वाढ झाली असून प्रभागातील विकास कामांसाठी एक कोटींचा निधी केला तर सर्वपक्षीय नगरसेवकांना मिळेल, असे काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मेट्रोमुळे रेल्वेचे प्रवासी घटले! पहिल्या तिमाहीत लोकलच्या प्रवाशांमध्ये ४४.६५ लाखांची घट; AC लोकलच्या प्रवाशांमध्ये ४१ लाखांची भरघोस वाढ

Navi Mumbai : ऐन सणासुदीत नारळ महागला; प्रतिनग १५ ते २० रुपयांची वाढ, पुढील २-३ महिने दर चढेच राहण्याची शक्यता

Pune : मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा; पंतप्रधानांचे छायाचित्र भिंतीवरून काढले

परवानगी नाकारल्याने आजचा OBC मोर्चा रद्द - नवनाथ वाघमारे

विविधता हेच भारताचे सौंदर्य - मोहन भागवत