मुंबई : भटकी जनावरे, मुके प्राण्यांचे आजारपण, अपघातग्रस्त व विविध व्याधींमुळे असह्य वेदना सहन करत असतात. त्यांना वेदनेतून मुक्त करून नवजीवन देण्यासाठी नागरिकांनी संवेदनशीलतेने पुढे यावे, असे आवाहन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले. घाटकोपर पूर्व येथील आराध्य भक्ती पार्क येथे आयोजित दोन दिवसीय मोफत पशु महा-शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या शिबिरात पहिल्याच दिवशी ११० हून अधिक आजारी व गरजू प्राण्यांची नोंदणी करण्यात आली आहे. शिबिरादरम्यान एका गायीच्या पोटातून तब्बल ४० ते ५० किलो प्लास्टिकचा गोळा काढण्यात आला.
बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग आणि अरहम युवा सेवा ग्रुप (अरहम अल्वेस केअर) यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे संकल्पक राष्ट्रसंत नम्रमुनी महाराज यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार पराग शाह, डॉ. कलीमपाशा पठाण, डॉ. गजेंद्र खांडेकर, डॉ. अनिल वडे तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते.
देखभालीची सुविधाही विनामूल्य
ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या उष्णतेचा आजारी आणि अशक्त प्राण्यांना त्रास होऊ नये, यासाठी शिबिरस्थळी वातानुकूलित डोम उभारण्यात आला आहे. त्यामध्ये अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, तपासणी कक्ष, शस्त्रक्रियेनंतर अतिदक्षता शुश्रूषा, निवारा तसेच चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्राण्यांवर उपचार केले जात आहेत. शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय सेवांसह आवश्यक देखभालीची सुविधाही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.
येथे संपर्क करण्याचे आवाहन
आपल्या परिसरात आजारी, जखमी, गाठी झालेला किंवा शस्त्रक्रियेची गरज असलेला प्राणी आढळल्यास नागरिकांनी animalcamp.alwayscare.org या संकेतस्थळावर किंवा ९६३५८ ३९८८८ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.