Mumbai : दादर रेल्वे स्थानक लवकरच 'चैत्यभूमी'; नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करणार - मुख्यमंत्री  
मुंबई

Mumbai : दादर रेल्वे स्थानक लवकरच 'चैत्यभूमी'; नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करणार - मुख्यमंत्री

दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘चैत्यभूमी’ करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.

Swapnil S

मुंबई : दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘चैत्यभूमी’ करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. राज्य सरकारने या प्रस्तावाला यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली असून, केंद्र सरकारकडेही पत्रव्यवहार करण्यात आला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. नामकरणाच्या प्रक्रियेसाठी विधिमंडळ समिती आणि अन्य आवश्यक प्रक्रियांबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार हिवाळी अधिवेशनात सर्व प्रक्रिया पूर्ण करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात मोठ्या संख्येने अनुयायी येण्याची शक्यता असल्याने पुरेशा सुविधा, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा, स्वच्छता आणि वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यंदा ५ आणि ६ डिसेंबरला सुमारे १५ लाख अनुयायी चैत्यभूमी परिसरात येण्याची अपेक्षा विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठकीत व्यक्त केली. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७० वा महापरिनिर्वाण दिन आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका, पोलीस, जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनासह सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. मागील वर्षी आढळलेल्या त्रुटी दूर करून नियोजन करावे, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.

मोर्चे, निदर्शनांवर प्रतिबंध

चैत्यभूमी परिसरात अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी आणि शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी आंदोलन, निदर्शने, मोर्चे आणि आंदोलने यांच्यावर प्रतिबंध घालण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी गृह विभागाला दिले.

निधी देणार

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाबाबत माहिती देताना, उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून मुख्य पुतळ्याशी संबंधित काही कामे अद्याप बाकी आहेत. खर्चात वाढ झाल्यामुळे निर्माण होणारा अतिरिक्त आर्थिक भार उचलण्यास सरकार तयार आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मनमानी वेतन कपातीला लगाम; कामाचे तास, साप्ताहिक सुट्टीबाबत महाराष्ट्र वेतन नियम २०२६ लागू

हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून; दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांना मदत हे कळीचे मुद्दे

Mumbai : वर्षभर रस्ते स्वच्छ ठेवा; VIP भेटीवेळीच देखावा नको; उच्च न्यायालयाने महापालिकेला सुनावले

बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावरून वाद : पालिकेत ठाकरे सेनेसह काँग्रेसचाही सभात्याग

बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावरून वादंग; शायना यांनी सोनियांच्या पुस्तकातील फोटो फाडल्याने विरोधकांकडून टीकेची झोड