Mumbai : धरण क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठा ८ टक्के पार, कपातीबाबत पालिकेची ‘थांबा व वाट पाहा’ भूमिका  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : धरण क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठा ८ टक्के पार, कपातीबाबत पालिकेची ‘थांबा व वाट पाहा’ भूमिका

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाणीसाठ्यात किंचित वाढ होत आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाणीसाठ्यात किंचित वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी पाणी पातळी ६ टक्क्यांपर्यंत घसरली असताना धरण क्षेत्रात संततधार बरसणाऱ्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. सातही धरणांतील पाणीसाठा २ जुलै रोजी ८.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने पाणी कपातीत वाढ करण्याबाबत आता मुंबई पालिकेने ‘थांबा व वाट पाहा’ ही भूमिका घेतली आहे.

मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो, तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठा लागतो. सध्या या धरणांमध्ये २ जुलै रोजी १ लाख १७ हजार ५३२ दशलक्ष लिटर पाणी साठा आहे. मात्र धरणातील पाणीसाठ्यात घट होत असल्याने १५ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू केली. धरण क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने पाणी कपात वाढवण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली होती. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

मध्य वैतरणा, मोडकसागर, तुळशी, विहार, भातसा आणि तानसा धरणांच्या पाणीसाठ्यात गेल्या २४ तासांत वाढ झाली आहे. मध्य वैतरणामध्ये ०.८९ मीटर, मोडकसागरमध्ये ०.५५ मीटर, तुळशीमध्ये ०.५२ मीटर, भातसामध्ये ०.४४ मीटर आणि विहारमध्ये ०.३९ मीटरने जलपातळी वाढली आहे. विहार आणि तुळशी धरण क्षेत्रात अनुक्रमे १९५ मिमी व २०७ मिमी पावसाची नोंद झाली असून धरण क्षेत्रात पाऊस कायम आहे.

दरम्यान, पाणीसाठ्यात वाढ होत असली तरी तो अद्याप समाधानकारक पातळीपासून दूर असल्याने मुंबई महापालिकेने सावध भूमिका घेतली आहे. सध्या लागू असलेल्या पाणी कपातीत तातडीने वाढ करण्याचा निर्णय न घेता ‘थांबा व वाट पाहा’ ही भूमिका पालिकेने घेतली आहे.

२ जुलै रोजी पाणीसाठा ( टक्केवारीत)

  • अप्पर वैतरणा - ०

  • मोडकसागर - २२.३५

  • तानसा - ३.६०

  • मध्य वैतरणा - १२.३८

  • भातसा - ५.७२

  • विहार - ५७.१८

  • तुळशी - ३३.९६

धरण क्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस ( मिमी)

  • अप्पर वैतरणा - २२.०० मिमी

  • मोडकसागर - ६७.०० मिमी

  • तानसा - ५१ मिमी

  • मध्य वैतरणा - ७० मिमी

  • भातसा - ५२.०० मिमी

  • विहार - १९५.०० मिमी

  • तुळशी - २०७ मिमी

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ठराविक दुकानातून पुस्तक खरेदीला चाप; शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

शेतकरी महिला विधेयक मंजूर; राज्याबाहेरील शेतमजूर महिलांना शेतकरी दर्जा नाही, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

Mumbai : यापुढे कठोर कारवाई करणार! महापौरांचा इशारा; मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन

राज्यात बोगस बियाण्यांचा पुरवठा गुजरातमधून; बच्चू कडू यांचा आरोप

लाभार्थी शेतकऱ्यांच्या थकबाकीवर व्याज आकारणीस मनाई