Mumbai : धरणांतील पाणीसाठा घटला; BMC चे नवे नियम जाहीर, पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाईचा इशारा 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : धरणांतील पाणीसाठा घटला; BMC चे नवे नियम जाहीर, पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाईचा इशारा

१६ जून २०२६ रोजी उपलब्ध पाणीसाठा केवळ १०.३५ टक्के इतकाच शिल्लक असल्याचे BMC ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा घटल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) पाणीबचतीसाठी नवे निर्बंध लागू केले आहेत. नवीन जलजोडण्यांवर तात्पुरती बंदी, काही क्षेत्रांतील पाणीपुरवठ्यात कपात आणि पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा BMC ने दिला आहे.

१५ मेपासून मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. दरम्यान, धरणांतील पाणीसाठा घटत असल्याने १७ जूनपासून नवीन बांधकामांना जलजोडणी देण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तसेच जलतरण तलावांच्या पाणीपुरवठ्यावर मर्यादा आणण्यात आल्या असून औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठी २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे.

धरणांतील पाणीसाठा घटल्याने BMC सतर्क

महानगरपालिकेच्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरांना दररोज सुमारे ४,६४६ दशलक्ष लिटर (MLD) पाण्याची आवश्यकता असते. उपलब्ध साठ्यातून सध्या सरासरी ४,२०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पावसाच्या विलंबामुळे धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे.

१६ जून २०२६ रोजी उपलब्ध पाणीसाठा केवळ १०.३५ टक्के इतकाच शिल्लक असल्याचे BMC ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकवण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

नवीन बांधकामांना जलजोडणी बंद

पाणी बचतीसाठी सर्व नवीन बांधकामांना दिल्या जाणाऱ्या जलजोडण्या पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व जलतरण तलावांच्या (Swimming Pool) जलजोडण्याही तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय नवीन जलजोडणी किंवा अतिरिक्त जलजोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यास पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईपर्यंत त्या मागण्या प्रलंबित ठेवण्यात येणार आहेत.

उद्योग, व्यापारी आस्थापना आणि स्पोर्ट्स क्लबसाठी फटका

औद्योगिक, व्यावसायिक आणि क्रीडा क्लब आस्थापनांच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात आली आहे. तसेच एरिएटेड वॉटर आणि पॅकेज्ड वॉटर बॉटलिंग प्रकल्पांना दिल्या जाणाऱ्या जलजोडण्यांमधून होणारा पाणीपुरवठाही आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार आहे.

पिण्याच्या पाण्याऐवजी पर्यायी स्रोत वापरण्याचे आवाहन

सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि प्रसाधनगृहे चालवणाऱ्या संस्थांना टँकर, बोअरवेल किंवा इतर पर्यायी स्रोतांतील पाण्याचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वाहन धुणे, उद्यानांतील झाडांना पाणी घालणे तसेच रस्ते आणि परिसर धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी विहीर, कूपनलिका किंवा बोअरवेलचे पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वे, MIDC आणि मोठ्या संस्थांनाही सूचना

मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, RCF, HPCL, BPCL, नेव्ही, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि BPT यांसारख्या संस्थांना दुय्यम वापरासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) मधून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पाण्याचा अपव्यय आढळल्यास कारवाईचा इशारा

पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन BMC ने केले आहे. तसेच महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचा गैरवापर किंवा अपव्यय होत असल्याचे आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाही कफ सिरप; औषध विक्रीच्या नियमात केंद्र सरकारचा मोठा बदल

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर; आता २० जूनला होणार निर्णय

सौरव गांगुलींकडून फेसबुक पेजविरोधात तक्रार दाखल; खोटी माहिती पसरवल्याचा आरोप

इंडोनेशियात ६.७ तीव्रतेचा भूकंप; इमारतींचे नुकसान, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, Video