मुंबईतील धोकादायक चार पादचारी पूल बंद; मस्जिद, माटुंगा स्थानकांवरील वाहतूक रोखणार 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

मुंबईतील धोकादायक चार पादचारी पूल बंद; मस्जिद, माटुंगा स्थानकांवरील वाहतूक रोखणार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वे स्थानकांवर वाढणारी गर्दी लक्षात घेता, संरचनात्मकदृष्ट्या धोकादायक ठरलेल्या मस्जिद आणि माटुंगा परिसरातील चार पादचारी पूल (एफओबी) बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वे स्थानकांवर वाढणारी गर्दी लक्षात घेता, संरचनात्मकदृष्ट्या धोकादायक ठरलेल्या मस्जिद आणि माटुंगा परिसरातील चार पादचारी पूल (एफओबी) बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मुंबई महापालिकेने मध्य रेल्वेला याबाबत सूचना दिल्या असून, आयआयटी मुंबईच्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर ही कारवाई करण्यात येत आहे. या पुलांवरून नागरिकांची ये-जा पूर्णपणे रोखण्यात येणार आहे.

मस्जिद स्थानकावरील भंडारी एफओबी, मस्जिद स्टेशन एफओबी, तर माटुंगा परिसरातील भाऊ दाजी रोडवरील माटुंगा लेव्हल क्रॉसिंग एफओबी आणि गुरुनानक हायस्कूलजवळील माटुंगा-दादर एफओबी या चार पुलांचा ऑडिटमध्ये समावेश करण्यात आला होता.

२७ ऑगस्ट रोजी बीएमसी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या पुलांची संयुक्त पाहणी करण्यात आली. त्यानंतर आयआयटी मुंबईने ३१ ऑगस्ट रोजी चारही पुलांचे स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर केले. पुलांच्या महत्त्वाच्या संरचनात्मक भागांमध्ये झीज आणि गंज झाल्याचे आढळून आले असून, त्यांची सद्यस्थिती पादचारी वापरासाठी असुरक्षित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आयआयटीने या पुलांवरील पादचारी वाहतूक तातडीने बंद करण्याबरोबरच आवश्यकतेनुसार पूल पाडून त्यांची नव्याने उभारणी करण्याची शिफारस केली आहे. गणेशोत्सवात रेल्वे स्थानकांवर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुलांवरील प्रवेश बंद करणे महत्त्वाचे असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी बंद करण्यात आलेल्या पुलांचा वापर करू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत गर्दीचे नियोजन आणि सुरक्षित पादचारी हालचाल सुनिश्चित करण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Modak Mahotsav 2026 : बाप्पाचा आवडता खाऊ मुंबईकरांना घरपोच; उकडीच्या व तळलेल्या मोदकांचा घेता येणार आस्वाद

BRICS Summit 2026 : पहलगाम हल्ल्याचा 'ब्रिक्स'कडून निषेध; 'नवी दिल्ली घोषणापत्र' स्वीकारले

Navi Mumbai : एमपीएससी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद

Kolhapur : माधुरी हत्तीणीचे जंगी स्वागत, Video

Mumbai : २१ स्टॉल केले जमीनदोस्त; मानखुर्द, गोवंडीत अतिक्रमणविरोधी मोहीम, पालिकेच्या एम-पूर्व विभागाची कारवाई