मुंबईचे उपमहापौर संजय घाडी  संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : राणीबागेतील रिक्त बंगल्यासाठी उपमहापौर आग्रही; पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लिहिले पत्र

पश्चिम उपनगरातील दहिसर येथे वास्तव्यास असलेले मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी शहरात अधिकृत निवासस्थान उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी भायखळ्यातील राणीबागेतील रिक्त बंगल्याची मागणी केली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील वाढती वाहतूककोंडी, उपनगरातून दक्षिण मुंबईत पोहोचण्यासाठी लागणारा प्रवासाचा वेळ आता लोकप्रतिनिधींनाही भेडसावू लागला आहे. पश्चिम उपनगरातील दहिसर येथे वास्तव्यास असलेले मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी शहरात अधिकृत निवासस्थान उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी भायखळ्यातील राणीबागेतील रिक्त बंगल्याची मागणी केली आहे.

राणीबागेत अतिरिक्त आयुक्तासाठी असलेला बंगला रिक्त असून तो मिळावा, यासाठी संजय घाडी यांनी मुंबई पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. उपमहापौर म्हणून दररोज महापालिका मुख्यालयातील बैठका, सभागृहाचे कामकाज, नागरिकांच्या भेटी, विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय तसेच प्रशासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणे आवश्यक असते. मात्र दहिसरहून मुख्यालयापर्यंत ये-जा करताना वाहतूक कोंडीमुळे तासनतास वेळ खर्ची करून अनेकदा नियोजित वेळेत पोहोचणेही कठीण होत असल्याचे घाडी यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे शहरात निवासस्थान उपलब्ध झाल्यास अधिक प्रभावीपणे कामकाज करता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

भायखळ्यातील राणीबाग परिसरात महापौरांचा अधिकृत बंगला असून त्यालगत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे निवासस्थान आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीनंतर हा बंगला रिक्त झाला आहे. हा बंगला उपमहापौरांच्या निवासासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी घाडी यांनी केली आहे.

दहिसर ते महापालिका मुख्यालयापर्यंतचा प्रवास वाहतूककोंडीमुळे अधिकच वेळखाऊ ठरतो, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

बंगल्यावर आणखीही दावेदार

अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी पदभार स्वीकारला आहे. सध्या त्या मलबार हिल येथील केंद्र सरकारच्या निवासस्थानी राहत असून ते निवासस्थान लवकरच रिकामे करावे लागणार आहे. राज्य सरकारकडून आयएएस अधिकाऱ्यांसाठी अन्य निवासव्यवस्था उपलब्ध होण्याची शक्यता असली, तरी त्यांनी राणीबागेतील या बंगल्यासाठी अर्ज केल्यास त्यांचाही दावा मजबूत मानला जात आहे. याशिवाय आणखी एका अतिरिक्त आयुक्ताकडूनही या बंगल्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती महापालिका वर्तुळातून मिळत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आषाढी वारीसाठी ५,५०० विशेष बसेस सोडणार; ग्रुप बुकिंग असल्यास कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार

Mumbai : कंत्राटदाराची मुजोरी! साकीनाका मॅनहोलप्रकरणी पालिकेच्या कारणे दाखवा नोटिशीला केराची टोपली

कतारचे माजी अमीर शेख थानी यांचे निधन; भारतात एक दिवसाचा दुखवटा

ब्रह्मपुत्रेवरील मेगा-धरणाच्या सुरक्षेची चीनी भूगर्भशास्त्रज्ञांना चिंता

दोन मिनिटांत गाड्या फुल्ल! गणपतीसाठी कोकण रेल्वेची तिकिटे 'रिग्रेट'; भाविक चिंतेत, अतिरिक्त गाड्यांची मागणी