मुंबई : घरांच्या किमती सतत वाढत असतानाही कुटुंबाच्या डोक्यावर स्वमालकीचे छप्पर असावे या भावनेतून आणि गरजेतूनही मुहूर्तावर घर खरेदी करण्याकडे मुंबईकरांचा कल कायम आहे. दिवाळीच्या ११ दिवसांच्या कालावधीत मुंबईत ३,६८३ मालमत्तांची नोंदणी झाली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ३,६६८ मालमत्तांच्या नोंदणींच्या तुलनेत यंदा त्यात ०.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. यातून मिळणाऱ्या महसुलात मात्र १३ टक्के वाढ झाली आहे.
नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार मालमत्ता नोंदणीच्या तुलनेत मुद्रांक शुल्क आणि नोंदणीच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलात अधिक वाढ झाली आहे. यंदा महसूल १३ टक्क्यांनी वाढून ३८४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३३९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. गेल्या चार वर्षांतील दिवाळीच्या संबंधित कालावधीत मालमत्ता नोंदणी आणि महसूल उत्पन्नाने यंदा सर्वोच्च पातळी गाठली आहे.
नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष- व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले, सणासुदीच्या काळात मुंबईतील निवासी मालमत्ता बाजारपेठेतील व्यवहारांची गती स्थिर राहिली आहे. दिवाळीच्या कालावधीत मालमत्ता नोंदणीमध्ये किरकोळ वाढ झाली असली, तरी महसूल उत्पन्नात झालेली १३ टक्क्यांची वाढ अधिक मूल्यांचे व्यवहार नोंदवले जात असल्याचे दर्शवते.
२०२६ मधील दिवाळीचा ११ दिवसांचा कालावधी १ ते ११ नोव्हेंबर असा होता. या काळात तीन दिवस सुट्टीचे होते. ८ नोव्हेंबरला दिवाळी साजरी करण्यात आली, तर गेल्या वर्षी दिवाळीचा कालावधी १३ ते २३ ऑक्टोबर असा होता. त्या काळात ३,६६८ मालमत्तांची नोंदणी झाली होती आणि ३३९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यावेळी नोंदणीमध्ये ५७ टक्के, तर महसुलात ४७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती.
ऑक्टोबर महिन्यातही मालमत्ता व्यवहारांची गती कायम होती. या महिन्यात १२,६९० मालमत्तांची नोंदणी झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ९ टक्क्यांची वाढ झाली. जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या दहा महिन्यांत एकूण १ लाख ३२ हजार ४० मालमत्तांची नोंदणी झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ही वाढ ७ टक्के आहे.
दिवाळीपूर्वीही मुंबईतील घरखरेदीदारांचा उत्साह कायम होता. मालमत्ता खरेदीसाठी अशुभ मानल्या जाणाऱ्या श्राद्ध पक्षाच्या २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ३,४१९ मालमत्तांची नोंदणी झाली. त्यानंतर ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सवात ४,६८० मालमत्तांचे व्यवहार नोंदवण्यात आले.
दिवाळीतील घरनोंदणी
वर्ष - मालमत्ता - महसूल
२०२३ - ३,३४६ - २५२ कोटी
२०२४ - २,३३९ - २३१ कोटी
२०२५ - ३,६६८ - ३३९ कोटी
२०२६ - ३,६८३ - ३८४ कोटी
वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांतील मालमत्ता नोंदणीमधील सातत्यपूर्ण वाढ ही घरखरेदीदारांचा कायम असलेला उत्साह दर्शवते. मुंबईच्या गृहबाजारपेठेतील मागणीची व्याप्ती आणि वर्षातील महत्त्वाच्या कालावधीतही व्यवहारांची गती कायम ठेवण्याची क्षमता यातून स्पष्ट होते.शिशिर बैजल, अध्यक्ष- व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया
एका दृष्टिक्षेपात
१ ते ११ नोव्हेंबर या दिवाळीच्या कालावधीत ३,६८३ मालमत्ता व्यवहारांची नोंद. नोंदणीत ०.४ टक्के वाढ
मालमत्ता नोंदणीतून ३८४ कोटी रुपयांचा महसूल
गेल्या चार वर्षांतील दिवाळीच्या कालावधीत यंदा मालमत्ता नोंदणी आणि महसूल उत्पन्नाची सर्वोच्च पातळी
ऑक्टोबरमध्ये मालमत्ता नोंदणीत वार्षिक तुलनेत ९ टक्क्यांची वाढ
जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या दहा महिन्यांत १,३२,०४० मालमत्तांची नोंदणी. वार्षिक वाढ ७ टक्के
श्राद्ध पक्षातही प्रतिसाद, २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान ३,४१९ मालमत्तांची नोंदणी
नवरात्रोत्सवात ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान ४,६८० मालमत्तांची नोंदणी