मुंबई : दिवाळीच्या सणासाठी बाजारपेठांमध्ये तयार फराळ खरेदीची लगबग सुरू झाली आहे. मात्र यंदा फराळाच्या किमतीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. साखर, खाद्यतेल आणि इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने तयार फराळ महागला आहे. त्यामुळे तयार फराळ खरेदी करणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसत आहे.
दिवाळीनिमित्त चकली, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे, शेव आणि अनारसे अशा विविध फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. घरगुती फराळ बनविण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत वाचविण्यासाठी अनेक ग्राहक तयार फराळाला पसंती देतात. मात्र, यंदा तयार फराळाच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांना तो खरेदी करताना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
फराळ तयार करण्यासाठी लागणारे खाद्यतेल, साखर, बेसन, रवा, मैदा आणि इतर साहित्याच्या किमतीतील चढ-उताराचा परिणाम फराळाच्या अंतिम दरावर झाला आहे. त्यातच उत्पादन खर्च, पॅकिंग आणि इतर खर्च वाढल्याने विक्रेत्यांनाही दर वाढवावे लागल्याचे चित्र आहे. दिवाळीच्या काळात नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिचितांना फराळाचे वाटप करण्याची परंपरा आहे. त्यामुळे तयार फराळाच्या खरेदीला विशेष महत्त्व असते. मात्र, वाढत्या किमतींमुळे यंदा ग्राहकांना फराळाचे प्रमाण आणि खर्च यांचा ताळमेळ साधावा लागत आहे. महागाईमुळे दिवाळीचा गोडवा कायम ठेवताना सर्वसामान्यांच्या खिशावर मात्र अतिरिक्त भार पडत आहे.
महागाईमुळे बचत गटांना चिंता
मुंबईतील विविध महिला बचत गट दिवाळी फराळ तयार करतात. दिवाळी हंगामात बचत गटांना मोठे उत्पन्न मिळते. फराळाच्या ऑर्डरमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेक बचत गटांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र वाढत्या महागाईमुळे बचत गटांसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महागाईमुळे यंदा फराळाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याने बचत गट ऑर्डरप्रमाणे साहित्य तयार करून विक्री करत आहेत.
महागाईमुळे फराळाचे सर्व साहित्य महाग झाले आहे. त्यामुळे गत वर्षीच्या तुलनेत यंदा तयार फराळाच्या दरात ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या उत्पादनाच्या फराळाच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणे आम्ही फराळ तयार करून देतो आहोत.अश्विनी कोळी, उन्नती महिला बचत गट
फराळांचे दर
चकली - ६५० रुपये किलो
करंजी - २५ रुपये एक पीस
गोड शंकरपाळी - ५५० रुपये किलो
पोहा चिवडा - ५५० रुपये किलो
तिखट लसूण शेव - ५५० रुपये किलो
मका चिवडा - ६०० रुपये किलो
बेसन लाडू घी - ८५० रुपये किलो
रवा लाडू - ७५० रुपये किलो
तिखट शंकरपाळी - ५०० रुपये किलो