मुंबई : नरक चतुर्थीच्या निमित्ताने सोमवारपासून सुरू होणाऱ्या दिवाळीसाठीची खरेदी संधी मुंबईकर ग्राहकांनी रविवारी सुटीच्या दिवशी साधली. शहर तसेच उपनगरातील प्रमुख बाजारपेठ, मॉल तसेच गल्ल्याही खरेदीदारांनी फुलून गेल्या होत्या. मुंबईत रविवारी दिवाळीपूर्व वातावरण उत्साह, रोषणाई आणि खरेदीच्या आनंदाने उजळलेले दिसले. एकूणच मायानगरीत फेस्टिव मूडचे चित्र दिसत होते.
रविवार सकाळपासूनच दादर, भुलेश्वर, बोरिवली, ठाणे, मुलुंड, अंधेरी, घाटकोपर, कल्याणसारख्या भागांतील दुकाने, पदपथावर ग्राहकांची गर्दी होती. कपडे, सोने-चांदी, घरगुती सजावटीच्या वस्तू, फटाके, मिठाई खरेदीसाठी अनेक ठिकाणी नागरिकांनी रांग लावली होती.
दिवाळीआधी १२ ऑक्टोबरला पावसाने नागरिकांच्या खरेदीवर पाणी फेरले होते. मात्र खरेदीदारांनी त्यानंतरच्या रविवारचा मुहूर्त साधला. रविवारी दिवसभर शहरात उत्सवाचे वातावरण होते. रस्त्यांवर दिव्यांच्या रोषणाईने झगमगाट होता. दुकाने, मोठी व्यापारी संकुले येथील झेंडूच्या फुलांच्या माळा आणि रंगीबेरंगी आकाशकंदीलांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेत होते.
मरिन ड्राइव्ह, गेटवे ऑफ इंडिया आणि वांद्रे येथील बँडस्टँडसारख्या ठिकाणी पर्यटक सहकुटुंब भटकत, सेल्फी घेत सणाचा आनंद लुटत होते. रात्रीची मुंबई रोषणाई आणि फटाक्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली होती.