आशिष सिंह
मुंबई : अवैध मानवी स्त्रीबीज काढण्याच्या कथित रॅकेटप्रकरणी सुरू असलेल्या मनी लाँड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्रातील रुग्णालये आणि इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) केंद्रांसह १० ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत ईडीने २९ लाख रुपयांची रोकड जप्त केली असून, बँक लॉकर आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक गोठवली आहे.
ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालय-२ ने १६ ऑक्टोबर रोजी ठाणे, बारामती आणि नाशिक येथील ठिकाणी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ही शोधमोहीम राबवली.
ईडीच्या म्हणण्यानुसार, या तपासात आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्त्रीबीज दानासाठी प्रवृत्त करणारे आणि एजंटांच्या माध्यमातून त्यांना आयव्हीएफ केंद्रे तसेच सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (एआरटी) बँकांना पुरवणारे कथित जाळे उघडकीस आले आहे.
विविध प्रोपरायटरशिप फर्मच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या एजंटांमार्फत महिलांना आर्थिक मोबदला दिला जात होता. या व्यवहारांतून संबंधित एजंटांनाही कमिशन मिळत असल्याचा आरोप आहे.
स्त्रीबीज काढण्याच्या प्रक्रियेसाठी संबंधित महिलांना महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील विविध संस्थांमध्ये पाठवले जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे या महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असून, या प्रक्रियेसाठी निर्धारित करण्यात आलेल्या नियमांचे आणि सुरक्षात्मक उपाययोजनांचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा तपास बदलापूर (पूर्व) पोलिसांनी दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालावरून (एफआयआर) सुरू झाला. त्यानंतर पोलिसांनी मंजुषा वानखेडे आणि अन्य १६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे तसेच सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान आणि औषधे व सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत.
बनावट कागदपत्रांचा समावेश
या रॅकेटमध्ये बनावट कागदपत्रे तयार करून त्यांचा वापर केल्याचे पुरावेही ईडीला मिळाल्याचे सांगण्यात आले. आधार कार्ड, पॅन कार्ड, संमतीपत्रे, प्रतिज्ञापत्रे, जन्म प्रमाणपत्रे, रक्त तपासणी अहवाल आणि विम्याशी संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे. स्त्रीबीजदात्या महिलांची ओळख लपवणे, त्यांच्याकडून वारंवार स्त्रीबीजदान करून घेणे आणि त्या वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे खोटे चित्र निर्माण करणे, यासाठी या कागदपत्रांचा वापर केल्याचा संशय आहे.