मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात लालबाग-परळ परिसरात गणेशभक्तांची प्रचंड गर्दी होत असताना अनेक भाविकांनी आपली पादत्राणेच विसरून गेल्याचे समोर आले आहे. गेल्या बारा दिवसांत एफ-दक्षिण विभागातील लालबाग-परळ परिसरातून तब्बल आठ मेट्रिक टन चप्पल, बूट, सॅंडल आणि स्लीपर जमा करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ग्रीनसोल फाउंडेशनच्या सहकार्याने ही पादत्राणे गोळा केली आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे आगमन सुरू झाल्याने लालबाग, परळ, चिंचपोकळी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. २९ ऑगस्टपासून गणेशमूर्तींच्या आगमन मिरवणुकांदरम्यान तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून पादत्राणे काढली जात होती. गर्दी आणि दर्शनाची घाई यामुळे अनेकांना चप्पल-बूट परत घेण्याचा विसर पडला. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच सुमारे चार मेट्रिक टन पादत्राणे जमा झाली होती. त्यानंतर उत्सवाच्या १२ दिवसांत ही संख्या दुप्पट होत ८ मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली. लालबागचा राजा, गणेश गल्ली, चिंतामणी गणेशोत्सव मंडळ परिसर, डॉ. बी. ए. रोड व आसपासच्या मार्गांवरून सर्वाधिक पादत्राणे गोळा केली.
आदिवासी भागातील लोकांना वाटप!
एफ-दक्षिण विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही पादत्राणे संकलित केली असून ग्रीनसोल फाउंडेशनकडे सुपूर्द केली आहेत. संस्थेकडून भिवंडी येथील कार्यशाळेत या चप्पल-बुटांची पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे. दुरुस्ती आणि पुनर्निर्मितीनंतर ही पादत्राणे गरजू नागरिक, विद्यार्थी तसेच आदिवासी भागातील लोकांना मोफत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.