मुंबई : अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागाने मुंबईतील १० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये भायखळा येथील जे.जे. रुग्णालयाची सेंट्रल कँटीन आणि मरीन लाइन्स येथील इस्लाम जिमखान्यावरील हुमा कॅटररचा समावेश आहे.
या कारवाईमध्ये उपाहारगृहे (ईटरीज), दुग्धोत्पादक युनिट्स आणि अन्न सेवा देणाऱ्या आस्थापनांचा समावेश आहे. निरीक्षकांच्या (इन्स्पेक्टर्स) तपासणीत कर्मचाऱ्यांची स्वच्छता, कीटक नियंत्रण (पेस्ट कंट्रोल), अन्नाची साठवणूक आणि जागेची देखभाल यामध्ये त्रुटी आढळल्या. याशिवाय, कोकण विभागात संशयास्पद गुणवत्तेच्या आणि लेबलिंगच्या उल्लंघनावरून सुपारी, दूध आणि पनीरच्या साठ्याविरोधातही स्वतंत्रपणे कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कागदपत्रांचा अभाव
एफडीएच्या माहितीनुसार, अनेक आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी हँडग्लोव्ह्ज, हेड कॅप (टोपी) आणि ॲप्रन यांसारख्या आवश्यक स्वच्छता सुविधांचा अभाव होता तसेच काही ठिकाणांवर कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि अन्न सुरक्षेचे प्रशिक्षण या संबंधीची कागदपत्रेही उपलब्ध नव्हती.
परवाना निलंबित झालेली १० आस्थापना
जे.जे. रुग्णालयाची सेंट्रल कँटीन
इस्लाम जिमखान्यावरील हुमा कॅटरर
कांदिवली येथील मिल्कोझ डेअरी प्रोडक्ट्स
सांताक्रूझ येथील ला पिनोझ पिझ्झा
विलेपार्ले येथील डी.जे. संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील एफ३ कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस
ऑपेरा हाऊस येथील नारायण डोसा
जे.जे. रुग्णालयाजवळ असलेले अबरार किराणा स्टोअर
गिरगाव येथील गोल्डन स्टार रेस्टॉरंट
चारकोप येथील पालिवाल डेअरी
इस्लाम जिमखान्यावरील नवाब ज्युस सेंटर
पॅकेजिंग, लेबलिंगचे उल्लंघन
कोकण विभागातील एका अन्य कारवाईमध्ये एफडीएने नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी येथील उमा एक्सपोर्ट्स लिमिटेडवर कारवाई करत १.३३ कोटींहून अधिक किमतीच्या ५२,०१६ किलो सुपारीचा साठा जप्त केला. गुणवत्तेबद्दल संशय आणि पॅकेजिंग व लेबलिंगच्या उल्लंघनामुळे ही कारवाई करण्यात आली.
तळोजा एमआयडीसीतही कारवाई
तळोजा एमआयडीसी येथील सावरिया मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्समध्ये, लेबलिंगमधील अनियमितता आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या (एफएसएसए) कलम २३, २६ आणि २७ चे उल्लंघन केल्याप्रकरणी २.३७ लाख मूल्याच्या ४,५९६ लिटर थंड कच्च्या दुधावर (ज्यामध्ये ३,९९८ लिटर गायीचे दूध आणि ५९८ लिटर म्हशीच्या दुधाचा समावेश आहे) कारवाई करण्यात आली. एफडीएने तळोजा येथील मातेश्वरी फूड्स येथे लेबलिंगमधील त्रुटींमुळे ३० हजार ९४० रुपये किमतीच्या ११२ किलो लो-फॅट पनीरवरही कारवाई केली आहे.
कॉस्मेटिक आस्थापनांचे तीन परवाने निलंबित, एक रद्द
त्वचेचा रंग उजळ करणाऱ्या पाकिस्ताननिर्मित क्रीम्समध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात विषारी जड धातू आढळल्याच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) जून ते ऑगस्टदरम्यान कॉस्मेटिक आस्थापनांच्या २९ तपासण्या केल्या असून चार अंमलबजावणी कारवाई (एनफोर्समेंट ॲक्शन) केल्या आहेत. यामध्ये तीन परवाने निलंबित करणे आणि एक परवाना रद्द करण्याच्या कारवाईचा समावेश आहे.