मुंबई : हायराईज इमारतीत लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १० वर्षांनंतर मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात १०४ मीटर उंच 'टर्न टेबल लॅडर’ दाखल होणार आहे. 'टर्न टेबल लॅडर’मुळे ३४ मजल्यांपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.
मुंबईचा विकास झपाट्याने होत असून गगनचुंबी इमारती उभारण्याची जणू शर्यतच लागली आहे. मात्र, अग्निशमन दलाकडे सद्य:स्थितीत ३२ मीटर, ४० मीटर, ५५ मीटर, ६४ मीटर तसेच ९० मीटर उंचीच्या ‘टर्न टेबल लॅडर’ उपलब्ध आहेत. मात्र, ९० मीटर लॅडर वारंवार नादुरुस्त होत असल्याने उंच इमारतींमधील आग विझविताना अडचणी निर्माण होत होत्या. यावर उपाय म्हणून महापालिकेने गेल्या वर्षी १०४ मीटर उंचीच्या दोन ‘टर्न टेबल लॅडर’ खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून लवकरच अत्याधुनिक शिड्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
सध्या ६४ मीटर लॅडरद्वारे सुमारे २१ व्या मजल्यापर्यंत तर ६८ मीटर उंचीच्या शिडीद्वारे २३ ते २५ व्या मजल्यापर्यंत पोहोचता येते. ९० मीटर लॅडरच्या मदतीने सुमारे ३४ मजल्यांपर्यंत आग विझविणे शक्य होणार आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, नव्या १०४ मीटर ‘टर्न टेबल लॅडर’मुळे ३४ मजल्यांपर्यंत थेट पोहोचून आग विझविणे, बचावकार्य करणे आणि नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे अधिक वेगाने शक्य होणार आहे.
१०४ मीटर ‘टर्न टेबल लॅडर’ची वैशिष्ट्ये
३४ मजल्यांपर्यंत थेट पोहोचण्याची क्षमता
उंच इमारतींमधील आग विझविण्यासाठी अत्याधुनिक हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म
बचावकार्य आणि नागरिकांच्या स्थलांतरासाठी उपयुक्त