मुंबई : मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या अग्निशमन दलातील २१७६ अधिकारी आणि जवानांना अत्याधुनिक गणवेश मिळणार आहे. कोट, ट्राऊजर, हुड आणि ग्लोव्हज यांसह गणवेश मिळणार असून प्रत्येक गणवेशासाठी ७० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.
मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान आग लागण्याच्या घटनांबरोबरच रेल्वे अपघात, इमारत कोसळणे, झाडे कोसळणे तसेच विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याच्या मोहिमांमध्ये सहभागी होतात. अशा मोहिमांदरम्यान त्यांना प्रचंड उष्णता, धूर तसेच अन्य धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे आगीच्या ठिकाणी काम करताना पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट (पीपीई) परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या स्वसंरक्षण साहित्यामुळे आगीची तीव्रता आणि उष्णतेपासून अग्निशमन कर्मचाऱ्यांचे संरक्षण होण्यास मदत होते. विशेष म्हणजे, या प्रकारच्या स्वसंरक्षण गणवेशासाठी भारतात स्वतंत्र मानक उपलब्ध नसल्याने मुंबई अग्निशमन दलाने यापूर्वी २००९-१० आणि २०१७-१८ या कालावधीत युरोपीय देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मानकांनुसार गणवेशाची खरेदी केली होती.
आता अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांसाठी नव्याने कोट, ट्राऊजर, हुड आणि ग्लोव्हज खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणला आहे. या खरेदीसाठी अमी एंटरप्राइज या कंपनीची निवड करण्यात आली आहे.